पांढर सोने म्हणून जिल्ह्याला हमखास उत्पन्न देणाऱ्या काजू पिकाला हवामानाची मोठी झळ बसली असून, उत्पादनात मोठी घट झाली आहे. काजूवर फुलकिडे, टी मॉस्क्युटो व रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे यावर्षी ४० ते ५० टक्के इतकेच उत्पादन आहे.
यावर्षी गावठी काजूसाठी १०५ तर वेंगुर्ला ४ व ५ साठी ११५ रुपये दर दिला जात आहे. उत्पादन कमी असल्याने दर वाढवून मिळावा किंवा हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
ओल्या काजूगर विक्रीबरोबर वाळविलेल्या काजू बीची विक्री करून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळते. गावठी काजूबरोबर कोकण कृषी विद्यापीठ प्रमाणित वेंगुर्ला ४ व ५ या वाणाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, सुरुवातीपासून फुलकिडे (थ्रीप्स), टी मॉस्क्युटो प्रादुर्भाव झाला.
त्यामुळे काजू पिकावर कीडरोग प्रतिबंधात्मक फवारणी करावी लागली. काही ठिकाणी फवारणी करूनही शेतकरी फुलकिड्यावर नियंत्रण मिळवू शकले नसल्यामुळे काजू बीच्या टरफलावर काळे डाग पडून बिया काळवंडल्या आहेत.
हवामानातील बदलामुळे यावर्षी काजूचे उत्पादन घटले असून, उत्पादन व खर्च यांचा मेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. प्रक्रिया केलेल्या काजुगराचाही उठाव होत नसल्याने प्रक्रिया उद्योग धोक्यात आला आहे. त्यामुळे हमीभावाची मागणी जोर धरत आहे.
काजू पिकावरील संकटे
• प्रतिकूल हवामानामुळे व्यवस्थापन खर्चात वाढ.
• खते, फवारणी खर्चात वाढ, पण काजू बी दर अल्प.
• मनुष्यबळाचा अभाव.
• कमी असलेल्या आयात करामुळे परदेशी काजूचा दर कमी.
• जादा दरामुळे स्थानिक काजूपेक्षा परदेशी काजूला मोठी मागणी.
• मोठ्या कंपन्या, व्यापाऱ्यांकडून कमी दराने काजू खरेदी.
काजूचे दर
गावठी - ₹ १०५
वेंगुर्ला ४/५ - ₹ ११५
१.१० लाख हेक्टर काजूचे क्षेत्र
१५० कोटी वार्षिक उलाढाल
३ टन काजू उत्पादन हेक्टरी
६० टक्के काजू बोंड निर्मिती
बोंड, टरफल वाया
काजू बोंडावर तसेच टरफलावर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्यामुळे ते मातीमोल होते. त्यावर प्रक्रिया होणे आणि अशा प्रक्रिया व्यवसायांना चालना मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशिक्षण देण्याचीही गरज आहे.
आयातीमुळे स्थानिक उत्पादनावर परिणाम
विविध प्रक्रिया उद्योगांसाठी काजुगरांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. काजूवरील तुलनात्मकदृष्ट्या कमी असलेले आयात कर व अन्य करांमुळे परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या काजूचा दर देशातील काजूच्या तुलनेने कमी असतो. त्यामुळे सिंगापूर, आफ्रिका, ब्राझील, व्हिएतनाम या देशांमधून मोठ्या प्रमाणावर काजू बी भारतात आयात केली जाते. याचा प्रतिकूल परिणाम देशी काजू बीच्या खरेदीवर होत आहे.
हवामानातील बदलाचा परिणाम काजू पिकावरही होऊ लागला आहे, कीडरोगापासून संरक्षण करण्यासाठी आंब्याप्रमाणे कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. उत्पादनासाठी खर्च वाढला आहे. तुलनेने अपेक्षित दर मिळत नसल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने काजूला हमीभाव जाहीर करावा. - रोहित कळंबटे, रत्नागिरी
अधिक वाचा:काजू पिकातील कीड नियंत्रण कसे कराल?