Join us

वातावरणातील बदलामुळे कोवळ्या पिकांवर संकट, हरभरा पीकावर अळीचा प्रादुर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 2:15 PM

रब्बी हंगामातील पिकांवर अळीचा प्रादुर्भाव, कीडीपासून पिकाला कसे वाचवाल?

पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा शिल्लक पाण्यावरच रब्बीची पेरणी केली. मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळीला आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी महागडी औषधी फवारणी करीत आहेत. खरिपात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीत उसनवारी करून पेरणी केली. संकटाची मालिका संपत नसल्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

यंदा सुरुवातीपासूनच वरुणराजाची अवकृपा राहिली आहे. परिणामी जलसाठ्यात वाढ झाली नाही. खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढण्याचे शेतकऱ्यांचे नियोजन असते. यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी विहिरीतील जेमतेम पाण्यावर गहू, हरभरा, मका, ज्वारी, मोहरीसह इतर पिकांची पेरणी केली. मात्र, या पिकाला बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे.

हरभरा पीकावर अळीचा प्रादुर्भाव

हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव वाढला असून हरभऱ्याला आलेली फुले गळून पडत आहेत. हरभरा पिकातून अपेक्षित उत्पादन हाती न लागण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शासनानेदेखील अद्याप अनुदानाचे पैसे बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केलेले नाही. एकीकडे विहिरीत पाणी नसताना पिके जगविण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसत आहेत. दुसरीकडे नैसर्गिक बदलामुळे रब्बीतही शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

वातावरण बदलामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी इमामेक्सीन बॅनझोएट ५ टक्के या औषधाची फवारणी करावी. यामुळे अळीचा प्रादुर्भाव राहणार नाही.- नाथराव शिंदे, कृषी अधिकारी

दोन एकर हरभरा पेरलेला आहे. खराब वातावरणामुळे हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार आहे. कृषी खात्याने मार्गदर्शन केले पाहिजे. -अतुल पारगावकर, शेतकरी

घाटे अळीने होतेय नुकसान

रब्बी हरभऱ्याचे पीक हे काही ठिकाणी वाढीच्या तसेच बहुतांश ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे. या दरम्यान घाटे अळीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड असून या किडींची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातून २ ते ३ दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरीतद्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढरकी होऊन वाळतात व गळून पडतात.

मक्यावर अमेरिकन लष्करी अळी आली आहे? कसे कराल व्यवस्थापन

काय करावे उपाय?

घाटे अळीचे परभक्षक उदा. बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी इत्यादी पिकामधे फिरून घाटे अळ्या वेचून त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. अवाजवी किटकनाशकांची फवारणी केल्यास पक्षी किटकनाशकांच्या वासामुळे शेतामधे येणार नाहीत. त्यामुळे किटकनाशकांचा जास्त वापर टाळावा.

हरभऱ्यावरील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापनज्या शेतामधे मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून उपयोग केला नसेल त्या शेतामधे बांबूचे त्रिकोणी पक्षी थांबे (प्रति हेक्टर २० पक्षी थांबे) तयार करून शेतामधे लावावे. त्यामुळे पक्षांचे अळ्या वेचण्याचे काम सोपे होते.

टॅग्स :हरभराशेतकरीहवामानशेती क्षेत्र