कृषी विभागामार्फत खरीप हंगाम २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटांसाठी ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल या पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत सहभागी न झालेल्या शेतकऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत संधी आहे. राज्यातील विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध प्रयोग करण्यात येतात.
उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढते. नव्या उमेदीने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास ते जोमाने सज्ज होतात.
नवनव्या प्रयोगामुळे कृषी उत्पादनांमध्ये भर घालण्यासाठी अन्य शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.
स्पर्धेचे हे आहेत नियम व अटी
* किमान एक एकर क्षेत्रावर लागवड आवश्यक
* स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र आहे.
* सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये व आदिवासी गटासाठी १५० रुपये राहील.
* स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो कसत असणे आवश्यक आहे.
* पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता किमान ४० आर (१ एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
* स्पर्धेच्या इतर अटी व शर्तीची माहिती कृषी विभागाच्या संकेतस्थळासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे.
असे मिळेल बक्षीस
१. राज्यस्तरावर प्रथम ५०, द्वितीय ४० तर तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या शेतकऱ्याला ३० हजाराचे बक्षीस दिले जाणार आहे.
२. स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम ५ हजार, दुसरे ३ हजार तर तिसरे बक्षीस २ हजार असणार आहे.
३. जिल्हास्तरावर प्रथम १० हजार, दुसरे ७ तर तिसरे बक्षीस हे ५ हजार आहे.
४. शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश लक्षात घेऊन राज्यांतर्गत पीक स्पर्धा राबवण्यात येत आहेत.
असे होणार आयोजन
पीक स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित होणार आहे. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता नोंदविण्यात येईल.
यानंतर राज्य व जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यातही या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.