पुणे : राज्यात मान्सूनचा पावसाने सर्वदूर हजेरी लावली असून राज्यातील शेतकऱ्यांनी पेरण्यांची तयारी सुरू केली आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी पहिल्या एक दोन पावसांच्या ओलीवरच पेरण्या पूर्ण केल्या आहेत. कापसाच्या बियाण्यांमध्ये लिंकिंग आणि विशिष्ट वाणाच्या मागणीत वाढ झाल्यामुळे काहीसा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं पण आत्तापर्यंत राज्यातील १ चतुर्थांश पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, कृषी विभागाच्या १८ जून रोजीच्या पीक पेरणी अहवालानुसार राज्यातील ८ लाख ८ हजार ७९२ हेक्टर एवढ्या क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. तर यंदा राज्यातील १ कोटी ४२ लाख क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होणे अपेक्षित आहे. यंदा पावसाचा अंदाज चांगला असल्यामुळे येवढ्या क्षेत्रावर पेरण्या होण्याची शक्यता आहे.
पावसाचा जोर कमीमागच्या एका आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाला होता पण उद्यापासून म्हणजे २३ ते २४ तारखेपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पेरण्यांची घाई नकोअनेक ठिकाणी अद्याप चांगला पाऊस झाला नाही. परंतु शेतकरी पेरण्यांची घाई करताना दिसत आहेत. पण जर वेळेवर पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरण्यांची वेळ येऊ शकते. त्यामुळे ज्या भागात ७५ ते १०० मिमी पाऊस झाला आहे अशा भागांतील शेतकऱ्यांनीच पेरण्या कराव्यात असे आवाहन करण्यात येत आहे.
कोणत्या पिकाची झाली किती पेरणी?
- भात - २७ हजार ९८३ हेक्टर
- खरीप ज्वारी - १ हजार ४५२ हेक्टर
- बाजरी - १० हजार ६८ हेक्टर
- सोयाबीन - १ लाख ७६ हजार २६० हेक्टर
- मूग - ११ हजार ७८९ हेक्टर
- कापूस - ४ लाख ७८ हजार ९५९ हेक्टर
- मका - ५७ हजार ८२७ हेक्टर
- तूर - ३० हजार ३८९ हेक्टर