Crop Cultivation:
बालाजी आडसूळ
कळंब : खरिपातील पिके पूर्णतः मोसमी पावसावर अवलंबून असल्याने अख्खा हंगामच बेभरवशाचा ठरतो. शेतकऱ्यांच्या हाती कष्ट करणे असते, बाकी पदरात पडेल तेव्हाच खरं! अशीच स्थिती.
याच अनिश्चिततेला काही शेतकरी हमखास उत्पन्नाच्या वाटेवर नेतात. अशाच 'टोकण व ठिबक' या सूत्रीचा वापर करत तुरीला 'शाश्वत पीक' करण्यात यश मिळवलेल्या शेतकऱ्याचे प्रयत्न यशस्वी ठरले आहे.
कळंब तालुक्यातील मोहा येथील अंबादास शिवाजी गव्हाणे, त्यांचे सुपुत्र अजिंक्य व आदित्य गव्हाणे, गव्हाणे यांची एकूण ८ एकर शेत जमीन, जमिनीची प्रत जेमतेम, मात्र शेतीत काहीतरी वेगळी करण्याची गव्हाणे कुटुंबाची धडपड, यंदा त्यांनी आपल्या क्षेत्रापैकी साडेतीन एकर क्षेत्रात तूर पीक घेतले आणि टोकण पद्धतीने लागवड केली.
दूसरे शेतकरी वाशी तालुक्यातील घोडकी येथील सतीश काशीनाथराव दळवे, सतीश हे बार्शी शहरातील एक व्यावसायिक, आपला व्यवसाय सांभाळून ते घोडकी येथे उत्तम प्रकारची शेती करतात.
योग्यवेळी योग्य काम अन् नियोजन या सूत्राचा अवलंब केल्याने त्यांच्या 'अपडाऊन' चा शेती पिकांवर परिणाम होत नाही. दळवे यांनीही यंदा दहा एकरात टोकण पद्धतीने तूर लागवड केली आहे.
फक्त सव्वा किलो बियाणं, पावणेदोन हजार झाडं
प्रचलित पद्धतीने पेरणी करण्यास बियाणे जास्त लागते. परंतू टोकण पद्धतीने लागवड करुन एकरी सव्वा किलो बियाणे लागले. मोहाच्या गव्हाणे यांनी सव्वा ते दीड किलो याप्रमाणे 'बीडीएन-७११' हे वाण टोकण केले. पुढे यातून अंकूर फुटलेले ६ हजारांवर मोड फुटले. घोडकीच्या सतीश दळवे यांनी १० एकराला केवळ १३ किलो निर्मलचे बियाणे वापरले. झाडांची संख्या १५ हजारांवर पोहोचली.
लागवड व मशागतीचं गणित....
मोहा येथील अंबादास गव्हाणे यांनी सहा बाय दीड अंतरावर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तर घोडकी येथील सतीश दळवे यांनी ८ बाय दीड अंतरावर १५ मे रोजी तूर टोकण केली. पुढे उभयतांनी आपल्या पिकाला ड्रीप बसवले, पावसाच्या उघडीपीनंतर गरजेनुसार व वापसा पाहून पाण्याचे नियोजन केले. गव्हाणे यांनी तीन तर दळवे यांनी पाच फवारण्या केल्या. आवश्यकतेनुसार मशागत, खताची मात्रा दिली.
तूर पिकाची वैशिष्ट्ये
■ तूर हे खरिपातील एक मुख्य पीक
■ साधारणतः कोरडवाहू कडधान्य पीक
■ मुख्य पिकांत आंतरपीक म्हणूनही मान
■ मध्यम ते भारी जमीन प्रत आवश्यक
■ साधारणतः २१ ते २५ अंश सेल्सिअस तापमान हवे
■ ७०० ते १००० मि.मी. पर्जन्यमान उचित
■ साधारणतः १६० ते १७० दिवसांचे पीक
शेंडे खुडले, उत्पन्न वाढवले...
यंदा पाऊसपाणी चांगले झाले. यामुळे ठिबकवर जास्त पाणी देण्याची गरज भासली नाही. मात्र, पावसाने ओढ दिली असती तर दळवे व गव्हाणे यांच्या तुरीला पाण्याचा ताण सहन करावा लागला नसता.
दुसरीकडे झाडांची संख्या नियंत्रित असल्याने पुरेसा सूर्यप्रकाश, अन्नद्रव्ये, खते, फवारणी व मशागत प्राप्त झाल्याने झाडांची शाखीय वाढ व उंची, फुलांचे बहर, शेंगाचे प्रमाण, त्यातील दाण्यांची संख्या व त्यातील समानता साधानकारक आहे. शेंडे छाटणी गव्हाणे व दळवे या दोघांनी तीनवेळा केली.
तूर शेंगाने लगडली, उत्पादन दुपटीवर?
मोहा येथील अंबादास गव्हाणे यांच्या तुरीच्या झाडाला किमान आठशेच्या वर शेंगा आहेत. आपल्याला यंदा साडेतीन एकरात किमान ४० ते ४५ क्विंटल उतारा हाती पडणार असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.
घोडकी येथील सतीश दळवे यांची तांबडी तूर आहे. त्यांनी १० एकरात १०० क्विंटल तूर हाती पडण्याची आशा धरली आहे. त्यांच्या सध्या शेंगा पक्व होत आहेत.