मुंबई : राज्यातील विविध भागात चार ते पाच दिवसांपासून परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. शनिवारी रात्री विदर्भ मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसला आहे.
त्यामुळे कापूस भिजून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढून ठेवलेले सोयाबीन व इतर पिकांनाही या पावसाचा फटका बसला आहे.
नाशिक जिल्ह्यात पावसाचा अक्षरशः कहर केला असून दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चांदवड, देवळा आणि कळवणसह त्र्यंबक, बागलाणमध्ये दाणादाण उडवली आहे
राहुरी तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सततच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापसाच्या अक्षरशः वाती झाल्या.
अहिल्यानगरमध्ये सततच्या पावसाने पिके सडली
■ ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकयांच्या तोंडातला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे. नेवासा आणि कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला.
■ आठ दिवसांत पावसाने तिसऱ्यांदा हजेरी लावत काढणीला आलेल्या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी उन्हाळ कांद्याची रोपे सडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जळगावला अलर्ट
जळगाव जिल्ह्यात सोमवारी पुन्हा 'यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची स्थिती निर्माण झाली असून, आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून, यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.