Join us

Crop Damage : २ दिवसांत ३३ हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली; कुठे किती झाले नुकसान?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 6:59 PM

Maharashtra Heavy Rain Crop Damage : मागील दोन दिवसांत म्हणजे २४ आणि २५ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाने राज्यातील तब्बल ३३ हजारापर्यंत क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ऐन सुगीच्या दिवसांत नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

Maharashtra Rain Crop Damage Latest Updates : मान्सूनच्या पावसाने शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढले आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या चारही विभागांत मुसळधार पाऊस पडत आहे. तर मागील दोन दिवसांत म्हणजे २४ आणि २५ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाने राज्यातील तब्बल ३३ हजारापर्यंत क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ऐन सुगीच्या दिवसांत नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

दरम्यान, दोन दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद हवामान विभागाने नोंदवली आहे. तर मागील पाच दिवसांपासून म्हणजेच २१ सप्टेंबरपासून राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे बीड जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक ८ हजार हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, बाजरी आणि उडीद या पिकांचे नुकसान झाले आहे. तर त्यापाठोपाठ धाराशिव, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. 

नुकसान झालेल्या पिकांमध्ये सर्वांत जास्त क्षेत्र हे सोयाबीनचे असून त्यापाठोपाठ कांदा, मका, कापूस, बाजरी, मूग, उडीद, भात आणि भुईमूग या पिकांचा सामावेश आहे. अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन, उडीद, मूग या पिकांची काढणी सुरू आहे. या वेळेतच पावसाने हजेरी लावल्यामुळे उभे पीक वाया गेले आहे. तर मूगाच्या शेंगामधून अंकुर फुटल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कापसाचे बोंडे ओली झाल्यामुळे सरकीमधूनही अंकुर फुटले आहेत. 

कोणत्या जिल्ह्यांत किती पिकांचे नुकसान?

  • बीड - ८ हजार हेक्टर
  • धाराशिव - ७ हजार हेक्टर
  • नांदेड - ५ हजार हेक्टर
  • छत्रपती संभाजीनगर - ४ हजार ५०० हेक्टर
  • सांगली - ४ हजार ८६७ हेक्टर
  • सोलापूर - ३ हजार २०० हेक्टर
  • धुळे - १ हजार ७० हेक्टर
  • अहिल्यानगर - ९१६ हेक्टर
  • पुणे - ४३० हेक्टर
  • जळगाव - ३१७ हेक्टर
  • पालघर - ५५ हेक्टर
  • नाशिक - २५ हेक्टर
  • एकूण - ३२ हजार ९९७ हेक्टर
टॅग्स :शेती क्षेत्रपाऊसपीकहवामानशेतकरी