Crop Damage :
बीड :
चालु वर्षात चांगला पाऊस झाला. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसानही झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. पंचनामे करून योग्य ती मदत करण्यासाठी शासन पावले उचलत आहे.
यंदाच्या हंगामात नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून २५ टक्के अग्रिम दिला जाईल, असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी दिले. बीड येथे पोलिस मुख्यालयावर मुख्य शासकीय ध्वजारोहणप्रसंगी त्यांनी सांगितले.
यावेळी अन्न आयोगाचे अध्यक्ष सुभाष राऊत, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, मुख्य कार्यकारी अधिकारी संगीतादेवी पाटील, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, स्वातंत्र्यसैनिक मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात उपस्थित होती.
तत्पूर्वी हुतात्मा चौक येथे स्मारकास २१ तोफांची सलामी देण्यात आली. कृषिमंत्री मुंडे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. स्वातंत्र्य सैनिकांचे प्रतिनिधी म्हणून कारभारी शिवाजीराव सानप, अन्न आयोगाचे अध्यक्ष सुभाष राऊत, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांनीही या ठिकाणी मानवंदना देऊन अभिवादन केले.
पुढे मुंडे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घसघशीत लाभ देण्यात आलेला असून शेतकऱ्यांना दिलेल्या लाभाची रक्कम जिल्हा वार्षिक आराखड्यापेक्षाही अधिक आहे. पंतप्रधान किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील साडे ६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आतापर्यंत ३९९ कोटी रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.
या सोबतच २०२३ च्या खरीप हंगामासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील ८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे.
शासकीय योजनांची माहिती देणार
■ शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत बीड जिल्ह्यातील ६ लाख १८ हजारांहून अधिक भगिनींना दरमहा १५०० रुपये वाटप सुरू झाले आहे.
■ मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, वयोश्री योजना, आदींच्या माध्यमातून समाजाच्या सर्व घटकांना लाभ दिला जात आहे.
■ मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या श्रद्धास्थांनाना भेटी देता येणे शक्य होणार आहे.
■ तरुणांच्या हाताला काम देणाऱ्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात २ हजार ३८६ उमेदवारांना नियुक्ती दिली गेली आहे.
■ जिल्ह्यात १ हजार २०१ योजना दूतांच्या माध्यमातून घराघरात शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे, तसेच शेतकऱ्यांच्या कृषिपपांचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
■ प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत घरकुल योजना मंजुरी, मंजूर लाभार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच प्रतिकात्मक चावीचे वितरण यावेळी करण्यात आले.
■ शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई विमा योजनेतून व्हावी, यासाठी प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत जिल्ह्यात ४२० कोटींहून अधिक रक्कम यात देण्यात आली आहे.
■ यंदाच्या हंगामात झालेल्या बाधित शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम दिल जाईल, असे पालकमंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.