Lokmat Agro >शेतशिवार > Crop Damage : परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

Crop Damage : परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

Crop Damage : Heavy damage to kharif crops due to return rains | Crop Damage : परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

Crop Damage : परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

गेल्या ६ ते ७ दिवसांपासून सतत परतीचा पाऊस पडत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. (Crop Damage)

गेल्या ६ ते ७ दिवसांपासून सतत परतीचा पाऊस पडत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. (Crop Damage)

शेअर :

Join us
Join usNext

Crop Damage :

छत्रपती संभाजीनगर : 'पावसा, थांब आता जरा ! खूप झालं बरसून, विसावा घे थोडा, असा कसा रे तू, नको तेव्हा खूप बरसतो. हवा असतो तेव्हा वाट पाहायला लावतो. पेरणीच्या वेळी लांब सुट्टीवर जातो. पीक डोलायला लागलं की पुरात सर्व वाहून नेतो', असेच काहीसे वर्णन करण्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने भाग पाडले आहे.

शेतात खरीप पिकाची रास सुरू असताना व कापूस वेचणीला आला असताना गेल्या ६ ते ७ दिवसांपासून सतत परतीचा पाऊस पडत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सिल्लोड व कन्नड तालुक्यातील शेत शिवारात सततच्या पावसाने मका, बाजरी, सोयाचीन व कपाशीचे असे नुकसान झाले आहे.

चिंचोली परिसरात मक्याला कोंब 

चिंचोली लिंबाजी : कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजीसह परिसरातील नेवपूर, रेऊळगाव, वाकी, घाटशेद्रा, तळणेर, टाकळी अंतुर, वडोद, लोहगाव, बरकतपूर, रायगाव, गणेशपूर, जामडी जहागीर, वाकद, दहिगाव, शेलगाव, दिगाव, खेडी आदी गावशिवारात गेल्या सात दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातल्याने मका, कपाशी, सोयाबीन, अद्रकपाठोपाठ सर्वच खरीप पिकांवर संकट ओढवले आहे.

या पावसाचा सर्वाधिक फटका मका, कपाशी व अद्रकला बसला असून सोंगणी केलेल्या मक्याला जागेवर कॉब फुटू लागले आहे, तर कपाशीचे निम्म्याहून अधिक बोंडे झाडावरच काळी पडून सडू लागली आहेत. सततच्या पावसाने अद्रक पिकाला मूळ, कंद कूज व मर रोगाने ग्रासल्याने हजारो हेक्टर क्षेत्रावरील पीक बाधित झाले आहे

मका, सोयाबीनचे नुकसान वाढले

बनकिन्होळा: सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळ्ळ्यासह, बाभूळगाव बु., गव्हाली, वरखेडी, तलवाडा, भायगाव, गेवराई सेमी, कायगाव, निल्लोड, चिंचखेडा, भवन आदी परिसरात मागील ३ ते ४ दिवसांपासून सातत्याने पाऊस होत असल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

रविवारीही रात्री विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतामध्ये सोंगणी करून ठेवलेल्या मकाचा चारा, कणसे व सोयाबीन आदी पिकांचे पाण्यात भिजून मोठे नुकसान झाले आहे.

काही शेतात पाणी साचल्याने या पाण्यावर मकाची कणसे तरंगत होती. या पावसाने भिजलेल्या मकाच्या कणसांना आणि सोयाबीनला आता कोंब फुटत आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतात वेचणीला आलेला कापूस या पावसामुळे भिजला असून कापसाच्या वाती झाल्या आहेत.

तर कपाशीच्या झाडांना लगडलेल्या कैऱ्यांना पाणी लागल्याने कैऱ्या सडू लागल्या आहेत. पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

केळगाव परिसरात सोयाबीनला बुरशी
केळगाव : सिल्लोड तालुक्यातील केळगाव व परिसरात गेल्या ४ ते ५ दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात कापूस, मका, सोयाबीन तूर आदी पिके पाण्याखाली गेली आहेत

अधिक पाण्यामुळे सोंगणी आलेल्या मक्याच्या कणसाला अंकुर फुटू लागले असून सोयाबीनला बुरशी आली आहे. परिणामी शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. अनेक ठिकाणी कपाशीच्या कैऱ्या सडल्या आहेत.

त्यामुळे या पिकासाठी केलेला खर्चही निघतो की नाही, याची शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे या भागातील नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या जमिनीसुद्धा वाहून गेल्या आहेत.

नाचनवेल परिसरात कपाशीच्या कैऱ्या सडू लागल्या

नाचनवेल : कन्नड तालुक्यातील नाचनवेल परिसरात गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या महसूल मंडळात गुरुवारी व शुक्रवारी ४० मिमी आणि रविवारी रात्रीतून ६५ मिमी पाऊस झाला. या आगंतुक पावसाने शेतातील सोंगणी केलेले मकाची कणसे, चारा, सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असून, कपाशीची फुटलेली बोंडे, वजन देणाऱ्या मुख्य कैऱ्या सडण्यास सुरुवात झाली आहे.

* कैऱ्या परिपक्व अवस्थेत असताना ऐन पहिल्या वेचणीच्या वेळी पाऊस आल्याने कपाशीच्या उत्पादनात कमालीची घट येणार आहे. पावसामुळे फुटलेल्या कापसाची बोंडे झाडाखाली लोंबली तर अनेक कैऱ्या खराब झाल्या आहेत. भरमसाट खर्च करूनही कापसाचे एकरी उत्पादन सरासरी ७ ते ८ क्विंटलपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

अंजना नदी वाहू लागली

सलग चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजना नदीच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. सध्या ही नदी दुथडी भरून वाहत आहे. जिल्ह्यात गेल्या ६ ते ७ दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने खरिप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने हा पाऊस शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. या पावसाने मका, सोयाबीन, कपाशी, बाजरी आदी पिकांना अधिक फटका बसल्याने उत्पन्नावर परिणाम होणार आहे. शिवाय शेतकऱ्यांचे आर्थिक गणितही या अतिवृष्टीने बिघडणार आहे.

बाजारसावंगी परिसरात मक्याचे नुकसान

परिसरातील बाजरसावंगीसह सोबलगाव, रेल, इंदापूर, ताजनापूर, येसगाव, दरेगाव, पाडळी, लोणी, बोडखा, धामणगाव आदी गावशिवारात रविवारी रात्री दहा ते साडेअकरा असे दीड तास झालेल्या मुसळधार पावसाने खरिप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या मका पिकाची सोंगणी व काढणी सुरू आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांनी सोंगणी केलेल्या मक्याची कणसे दररोजच्या पावसामुळे  भिजल्याने या पिकाच्या कणसाला मोड फुटले गेले आहेत. कापूसही भिजून त्याच्या वाती झाल्या आहेत.

नागद परिसरात सलग ५ तास पाऊस

नागद : कन्नड तालुक्यातील नागद व परिसरात रविवारी रात्री ११ वाजेपासून सोमवारी पहाटे ४ वाजेपर्यंत सलग ५ तास विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील नदी, नाल्यांना पूर आला आहे.

या भागातील गडदगड नदीला व इतर नदी नाल्यांना पूर आला होता. पावसाचे पाणी शेतात मोठ्या प्रमाणात साचले आहे. त्यामुळे पिके पिवळी पडत असून कापसाची बोंडे काळी पडत आहेत.

मका, ज्वारी, सोयाबीन या  पिकांची स्थिती अधिकच द्यनीय झाली आहे. तूर  पिकाचे फुल गळून पडत आहेत. अधिक पाण्याने जनावरांचा चाराही सडत आहे.

उभी पिके पाण्याखाली

पळशी: सिल्लोड तालुक्यातील पळशी परिसरात रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास दोन ते अडीच तास जोरदार पाऊस झाल्याने शेतातील सोयाबीन, कपाशी, मका आदी उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळी सणाच्या तयारीला ब्रेक लागला असून त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.

पैठण, सिल्लोडमध्ये पाऊस

पैठण/ सिल्लोड: सोमवारी दुपारी व सायंकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व सिल्लोड तालुक्यातील काही भागांत जोरदार पाऊस आला. यामुळे सोंगणी केलेल्या पिकांना फटका बसत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. सोमवारी सायंकाळी पैठण तालुक्यातील डोरकीन, आडूळ, बिडकीन परिसरात जोरदार पाऊस झाला. तर सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा, उंडणगाव, अंधारी परिसरातही पावसाने धुमाकूळ घातला. सतत पाऊस होत असल्याने अनेक शेतकऱ्यांची सोंगणी करून पडलेली मका व सोयाबीन पिकांना कोड फुटले असून ते पीक संपूर्णपणे वाया गेले.

भराडी : सिल्लोड तालुक्यातील भराडी परिसराला रविवारी (ता. १३) रात्री साडेदहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत मुसळधार पावसाने झोडपले. विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश झालेल्या या पावसाने भराडी परिसरातील उपळी, दिडगाव, पिरोळा, वडोट चाथा, डोईफोड़ा, बोरगाव बाजार, सिसारखेडा आदी गाव शिवारातील सोयाबीन, मका, कापूस आदी पिकांची अपरिमित हानी झाली आहे.

कापणी केलेल्या मक्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मकाच्या कणसाला कोंब फुटले असून कणसे काळी पडून खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारात या मक्याला कवडीमोल भाव मिळणार आहे. तसेच या पावसामुळे कापूस फुटल्याने तो काळवंडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुसळधार पावसाने उपळी येथील अंजना नदीला व दिडगाव येथील पूर्णा नदीला मोठा पूर आला आहे

शिवना-टाकळी मध्यम प्रकल्प; २ दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग

हतनूर: कन्नड-वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला शिवना-टाकळी मध्यम प्रकल्प तुडुंब भरला असून, सोमवारी सकाळी ११ वाजता प्रकल्पाच्या दोन दरवाजांतून शिवना नदीपात्रात १ हजार १४९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

शिवना-टाकळी मध्यम प्रकल्पात मागील वर्षी सप्टेंबरअखेर फक्त २२ टक्केच पाणीसाठा होता. प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते.

मात्र, यंदा उत्तरा, पूर्वी या नक्षत्रांत सरी बरसल्याने प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे शिवना, गांधारी या प्रमुख नद्यांसह ओढे, नाल्यांना पूर आल्याने प्रकल्पात ९५ टक्के जलसाठा झाला होता.

दरम्यान, गेल्या ४ दिवसांपासून सलग प्रकल्प पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे पाटबंधारे विभागाने सोमवारी सकाळी ११ वाजता दोन दरवाजातून ७६८ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले. त्यानंतर, सायंकाळी ६:३० वाजता यात वाढ करून १ हजार १४९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

सोमवारी प्रकल्प १०० टक्के भरला आहे. या प्रकल्पात सध्या ३६.४९९ दलघमी जलसाठा असून, पाणलोट क्षेत्रातून आवक असेपर्यंत नदीपात्रात विसर्ग सुरू राहणार असल्याचे प्रकल्प उप अभियंता अशपाक शेख यांनी सांगितले.

परिसरातील ५० पेक्षा अधिक गावांना फायदा

शिवना-टाकळी मध्यम प्रकल्पाच्या दोन दरवाज्यांमधून शिवना नदीपात्रात १ हजार १४९ क्युसेकने पाणी सोडल्याने वैजापूर, गंगापूर तालुक्यातील नदीकाठच्या जवळपास ५० पेक्षा अधिक गावांना पिण्याच्या पाण्याचा व सिंचनासाठी फायदा होणार आहे.

Web Title: Crop Damage : Heavy damage to kharif crops due to return rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.