Crop Insurance Crop Damage : राज्यातील सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक असल्याने या भागांत पिके पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. तर पिकविमा मिळण्यासाठी राज्यभरातील १० लाख शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवल्या आहेत.
दरम्यान, ३१ ऑगस्टपासून राज्यभरातील विविध भागांत पावसाला सुरूवात झाली होती. पण विदर्भावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्यामुळे त्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या नैऋत्येकडील जिल्ह्यांत म्हणजे यवतमाळ, बुलढाणा हिंगोली, नांदेड, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे उभ्या पिकांची नासाडी झाली आहे. तर अनेक शेतातील माती वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
राज्यातील नुकसान झालेल्या भागांतील शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा मिळण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या पोर्टलवर जाऊन ऑलाईन तक्रारी आणि काही शेतकऱ्यांनी ऑफलाईन तक्रारी केल्या आहेत. सर्वाधिk तक्रारी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केल्या असून ३ सप्टेंबर अखेर बीडमधून १ लाख ७९ हजार शेतकऱ्यांनी पीक नुकसानाची तक्रार दिली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल ८४ हजार शेतकऱ्यांनी पिक विम्याच्या पोर्टलवर तक्रारी दिल्या असून राज्यातील ९ लाख ९५ हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या नुकसानीची तक्रार दिली आहे. तर पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
कशी करायची तक्रार?
पंतप्रधान पीक विमा योजनेच्या सरकारी पोर्टलवर आपला क्रमांक टाकून लॉगईन करणे, त्यानंतर आपण पिक विमा भरल्याची संपूर्ण माहिती आपल्याला दिसेल. आपल्या कोणत्या क्षेत्रावरील कोणत्या पिकांचे नुकसान झाले आहे याची माहिती नुकसानीची माहिती या टॅबवर जाऊन भरणे गरजेचे आहे.