Crop Damage :
बुलढाणा : जिल्ह्यात ९ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या धुव्वाधार पावसामुळे तब्बल १ लाख ४७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या सहा दिवसात वीज पडून तिघांचा, तर दोघांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे.
तर ३ हजार १८४ घरे व गोठ्यांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे ऑक्टोबर महिन्याच्या १४ दिवसांतच सरासरीच्या तीनपट पाऊस बरसला असून, १४ ऑक्टोबर रोजी ११ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
या पावसामुळे गेल्या सहा दिवसांमध्ये जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुलढाणा, चिखली, मोताळा, मलकापूर, खामगाव, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर आणि सिंदखेड राजा तालुक्याला या पावसाने फटका दिला आहे.
या नऊही तालुक्यातील ५७७ गावातील १ लाख २९ हजार ५११ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कपाशी, भाजीपाला, मका, तूर, केळी, झेंडू, पनवेल आणि शेवगा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दुसरीकडे मलकापूर तालुक्यातील ६५ हेक्टर शेत जमीन खरडून गेली असल्याची माहिती आहे. ९ ते १३ ऑक्टोबरदरम्यान प्रामुख्याने हे नुकसान झाले असून, १४ ऑक्टोबरची आकडेवारी अद्याप यात समाविष्ट झालेली नाही.
ऑक्टोबरच्या १४ दिवसातच तिप्पट पाऊस
बुलढाणा जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात १४ ऑक्टोबरपर्यंत सरासरी २५.८ मिमी पावसाची नोंद होत असते; परंतु यंदा प्रत्यक्षात ७९.२ मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत हा पाऊस ३०७.१ टक्के पडला आहे. जून ते १४ ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्याचा विचार करता सरासरीच्या १२५ टक्के हा पाऊस पडल्याचे जिल्हा कृषी हवामान केंद्रातील सूत्रांनी स्पष्ट केले. अद्यापही ऑक्टोबर महिन्याचे १५ दिवस बाकी आहेत.
सोमवारी ११ मंडळांत अतिवृष्टी!
रविवारी जिल्ह्यात २९ मंडळांत अतिवृष्टी झाली होती. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत पुन्हा ११ मंडळांत अतिवृष्टी झाली. मलकापूर तालुक्यातील पाचही मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. बुलढाणा ७१.३, मलकापूर-१०८.३, दाताळा- ९७.५, नरवेल-१०४.८, धरणगाव-१०८.८, जांभूळ- १६६, बोराखेडी-७०, रोहीणखेड-६६, शेलापूर-७२, शेंबा-९०.३, चांदुरबिस्वा-९७.३ मिमी पाऊस झाला.
१०९ गुरांचा मृत्यू
या अवकाळी पावसादरम्यान जिल्ह्यात १०९ गुरांचा संग्रामपूर, मलकापूर आणि देऊळगाव राजा तालुक्यात मृत्यू झाला आहे. यात ९८ लहान गुरे तर ११ मोठ्या गुरांचा समावेश आहे.
पाच जणांचा मृत्यू, तिघे जखमी
गेल्या पाच दिवसांमध्ये जिल्ह्यात वीज कोसळून तिघांचा, तर दोघांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. वीज पडून चिखली तालुक्यातील पांबुळवाडी येथील अमोल देवीदास जाधव, शेगावमधील वरखेड येथील शंकर रमेश हिंगणे आणि मेहकर तालुक्यातील हिवरा खुर्द परिसरातील अरुण श्यामराव खरात या तिघांचा मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले आहेत. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने उत्तम माधव इंगळे (रा. दिवठाणा, ता. चिखली) आणि विषमऊ तुकाराम पवार (पिंप्री गवळी) या दोघांचा अनुक्रमे १० आणि १३ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला.
काही तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतात पावसाचे पाणी साचले आहे. अशा ठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्याचा ताबडतोब योग्य मार्गाने निचरा करावा. कारण हे पाणी दीर्घकाळ शेतात साचून राहिल्यास उभ्या पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता प्रबळ होते. - मनेश यदुलवार, कृषी हवामान तज्ज्ञ, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा.
९ तालुक्यांना बसला फटका (क्षेत्र हेक्टरमध्ये)
अ.क्र. | तालुका | बाधित गावे | शेतकरी संख्या | नुकसान झालेले क्षेत्र |
१] | बुलढाणा | ४८ | २७२५ | ८७५ |
२) | चिखली | ०५ | ३३४८ | २६०० |
३) | मोताळा | १२६ | २११८२ | १८२४० |
४) | मलकापूर | ७५ | १२५७० | २४९६६ |
५) | खामगाव | १८ | ३८९ | २६८ |
६) | नांदुरा | ५२ | २४००० | ३१५१३ |
७) | जळगाव जा. | ११० | ३२०६८ | ३०८१३ |
८) | संग्रामपूर | १०६ | ३२९८० | ३७३०७ |
९) | सि. राजा | ०४ | १७४९ | ४९८ |
(हा प्राथमिक अंदाज असून ६५ हेक्टर क्षेत्रावरील जमीन खरडून गेली आहे.)