Crop Damage :
अकोला : यंदाच्या पावसाळ्यात गेल्या ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, नुकसानाचा अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवार (२७ सप्टेंबर) रोजी अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.
त्यानुसार जिल्ह्यात ५७ हजार ७५८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त ५७ हजार ३१९ शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ७९ कोटी ४४ लाख ३५ हजार ९०८ रुपये अपेक्षित मदतनिधीची मागणी अहवालात करण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आणि १ व २ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून, नदी व नाल्याला पूर आला होता. त्यामुळे जिल्ह्यात पिकांचे आणि शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या पथकांमार्फत जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्या संयुक्त स्वाक्षरीचा जिल्ह्यातील नुकसानाचा अंतीम अहवाल २७ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.
त्यानुसार जिल्ह्यातील बाधित ३४९ गावांत ५७ हजार ३१९ शेतकऱ्यांचे ५७ हजार ७५८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानाची मदत देण्यासाठी ७९ कोटी ४४ लाख ३५ हजार ९०८ रुपये अपेक्षित मदतनिधीची मागणी अहवालात करण्यात आली आहे.
५६,९८४ हेक्टर खरीप पिकांचे नुकसान !
• अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात सर्वाधिक खरीप (जिरायती) पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सातपैकी सहा तालुक्यांत ५६ हजार ४०१ शेतकऱ्यांचे ५६ हजार ९८४ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले.
• त्यामध्ये अकोट १९ हजार ३३६ हेक्टर, बाळापूर १ हजार ६२६ हेक्टर, पातूर २८६७ हेक्टर, अकोला १३ हजार ६४ हेक्टर, बार्शिटाकळी २ हजार १ हेक्टर व मूर्तिजापूर तालुक्यातील १८ हजार ८९ हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झाले. त्यात कापूस, सोयाबीन, तू आदी खरीप पिकांच्या नुकसानीचा समावेश आहे.
तेल्हारा वगळता सहा तालुक्यांत नुकसान !
जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी तेल्हारा तालुका वगळता जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शिटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या सहा तालुक्यांत ५७ हजार ७५८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
३८७ हेक्टर खरडून गेली जमीन !
अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ३८७ हेक्टर ७९ आर शेतजमीन खरडून गेली आहे. त्यामुळे ४२२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
पीक नुकसानाचे असे आहे वास्तव
पिके | शेतकरी | नुकसान |
जिरायत पिके | ५६४०१ | ५६९८४.५३ |
बागायत पिके | १५९,०६ | १५९.०६ |
फळ पिके | २२६.५८ | २६७ |