Crop Damage :
बुलढाणा :
जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची वारंवारिता वाढली असून, वर्षभरामध्ये शेती पिकाच्या क्षेत्राचे तब्बल ७६५ कोटी ६८ लाख २४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांना भरपाईपोटी ४९७ कोटी ७१ लाख रुपयांची मदत देण्यात आली असून, २६७ कोटी ९६ लाख रुपयांच्या उर्वरित निधीसाठी राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदलाचा शेती क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रशाकीय पातळीवरून शेतकऱ्यांना देण्यात आलेली मदत पाहता दिसून येत आहे.
गेल्यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी, अवर्षणप्रवण परिस्थिती आणि अवकाळी पाऊस अशा स्वरूपात हवामानातील बदल दिसला. एप्रिल महिन्यात चार वेळा अवकाळी पाऊस, मे महिन्यात दोन अवकाळी पाऊस अशी स्थिती होती.
परिणामस्वरूप या बदलांमुळे जिल्ह्यातील ६ लाख ३३ हजार १४६ हेक्टरवरील पिके बाधित झाली होती. दरम्यान, २०२४ मध्येही ऑगस्टपर्यंत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, जमीन खरडून जाणे या आपत्तीमुळे शेती क्षेत्राला फटका बसला असून ६५ हजार ५८६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.
सन २०१९ पासून परतीचा पाऊस जिल्ह्यात नासधूस करत असून, यंदाही तशीच स्थिती येण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. यंदा जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे.
ऑक्टोबरमध्येही जिल्ह्यात पाऊस रेंगाळण्याची शक्यता आहे. २० ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात यंदा पाऊस राहील. हवामानदृष्ट्या संवेदनशील असलेल्या १९६ जिल्ह्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आहे. गेल्यावर्षीही रब्बीत ३८३ गावांतील पिकांना फटका बसला होता. वातावरणातील बदलामुळे शेती करणे जिकरीचे ठरत असल्याचे चित्र आहे.
नुकसानभरपाईसाठी २६८ कोटींची मागणी
■ चालू वर्षात अवकाळी पाऊस व गारपीट, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेती क्षेत्राला फटका बसला आहे.
■ त्याच्या नुकसानभरपाईपोटी २६७ कोटी ९६ लाख ७४ हजार रुपयांची मागणी शासनस्तरावर करण्यात आली आहे.