Crop Damage : परतीच्या पावसाने बुधवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसह अकोट, सिरसोली, पातूर, बार्शीटाकळी येथे जोरदार हाजेरी लावल्याने शेतकऱ्यांची धावपाळ झाली.
छत्रपती संभाजीनगर: परतीच्या पावसाने बुधवारी दुपारी जिल्ह्यातील काही भागात धुमाकूळ घातला. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे वादळी वाऱ्याने दोन घरे पडली तर अनेक घरांवरील पत्रे उडून गेली. सोयगाव तालुक्यातील वाहेगाव शिवारात एका शेतकऱ्याची केळीची बाग आडवी झाली.
या पावसामुळे शेतकऱ्यांचे कपाशी, मका, सोयाबीन आदी काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. फर्दापूर परिसरात जोरदार पाऊस बुधवारी (९ ऑक्टोबर) राेजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह जवळपास २ तास जोरदार पाऊस झाला.
सध्या शेतात सोयाबीन, मका सोंगणी करण्यासाठी व कापूस वेचणीची लगबग सुरू आहे. या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. कापसाच्या वाती झाल्या असून मका, तूर व कपाशीचे उभे पीक जमीनदोस्त झाले आहे.
चिंचोली लिंबाजी : कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी परिसरात बुधवारी(९ ऑक्टोबर) रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सलग दुसऱ्या दिवशीही परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. अर्धा तास हा पाऊस झाला. त्यानंतरही पावसाची रिमझिम सुरू होती. या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
नागद : येथे बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसाने खरिप पिकांचे नुकसान झाले आहे.
सोयगाव : सोयगावसह परिसरात बुधवारी सायंकाळी पाच वाजता वादळी वाऱ्यासह परतीचा जोरदार पाऊस झाला. जवळपास २ तास हा पाऊस झाला. यावेळी वादळी वाऱ्याने वरखेडी (बु) येथील शेतकरी प्रीतमसिंग सूर्यवंशी यांच्या शेतातील केळीची अनेक आहे आडवी झाली.
सोयगाव परिसरातील कंकराळा, जरंडी, माळेगाव, पिंपरी, निबायती, बहुलखेडा, कवली, तिखी, उमर विहिरे, निमखेडी, घोसला आदी भागात अर्धा तास जोरदार पाऊस झाला. यात शेतात वेचणी केलेला कापूस भिजून नुकसान झाले आहे.
सिल्लोड : तालुक्यातील आमठाणा, अजिंठा सर्कलमध्ये बुधवारी दुपारी व सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात मका, कपाशीसह अनेक पिके आडवी झाली. अजिंठा येथील महेबुबखाँ महेताबखाँ पठाण यांच्या राहत्या घराच्या दोन भिंती पडल्या व घरावरील पत्रे उडाली.
येथील मिरासी गल्लीतील विजेच्या ३३ केव्हीच्या मुख्य तारा तुटल्यामुळे दुपारी २ वाजेपासून रात्री उशिरापर्यंत गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. याशिवाय तालुक्यातील केळगाव, भराडी, अंधारी, पळशी आदी भागातही पाऊस झाला.
सोंगणीला आलेला मका, कणसे व चारा पाण्यात भिजला. काही ठिकाणी उभा मका आडवा झाला. कापसाचेही मोठे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची दखल घेऊन तहसीलदार हारुण शेख यांनी अहवाल पाठविण्याचे आदेश तलाठ्यांना दिले आहेत.
अकोट: तालुक्यात बुधवारी रात्री जोरदार विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांना फटका बसला. अचानक वातावरणामध्ये बदल होऊन बुधवारी रात्री जोरदार पाऊस बरसला.
सध्या नवरात्रीची धामधूम सुरू आहे. त्यात या पावसामुळे अनेक उत्सव मंडळाच्या ठिकाणी पाणी साचले. ग्रामीण भागातसुद्धा जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्या शेतात अनेकांनी सोयाबीन काढून ठेवले असून, या पावसामुळे सोयाबीन, कपाशीसह इतर पिकांना फटका बसला. ग्रामीण भागात सोयाबीनच्या गंज्या झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली. जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते.
सिरसोली : अडगाव बुद्रुक महसूल मंडळातील सिरसोली परिसरामध्ये ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कपाशी पिकाला फटका बसला. त्यामुळे शेतकयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याचे चित्र आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.
यावर्षी परिसरामध्ये सोयाबीनचा पेरा जास्त झाला व सोंगणीला सुद्धा गती आली होती. परंतु मजुरांची टंचाई असल्यामुळे बहुतांश शेतकरी सोंगणी करू शकले नाही. परिणामी, पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी सोंगून ठेवलेले सोयाबीन, काही शेतकऱ्यांच्या शेतातील गंज्या तसेच मुहूर्ताचा कापूस सुद्धा भिजला.
पातूर : मागील दोन-तीन दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. दरम्यान, वातावरणात बदल होऊन बुधवारी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास विजांचा कडकडाट व मेघ गर्जनेसह तब्बल एक तास पाऊस बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांचे काढणीला आलेले सोयाबीन पीक भिजले.
सध्या सोयाबीन सोंगणी जोरात सुरु आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांनी सोंगून ठेवलेल्या सोयाबीन पिकाला फटका बसला. काही ठिकाणी सोयाबीन सोंगून ठेवून गंज्या लावल्या होत्या. त्या गंज्या झाकण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागली. या पावसामुळे विद्युत पुरवठा काही वेळ ठप्प झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागला.
बार्शीटाकळी : तालुक्यात ९ ऑक्टोबर रोजी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सोयाबीन काढणी व सोंगणी लगबग सुरू असताना अचानक सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.
हा पाऊस तूर व कापूस पिकाला जरी पोषक असला तरी काढणीला आलेले सोयाबीन पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. चोहोगाव शिवारात काही शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगून शेतात लावलेल्या गंजीत पावसाचे पाणी घुसल्याने सोयाबीन पीक भिजले तर सोयाबीन काढणी यंत्राने काढून भरलेले पोतेही भिजले आहेत.
तालुक्यातील अनेक भागात या पावसाने हजेरी लावली असून, पुढील काही दिवस जर पाऊस सुरूच राहिला तर शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता आहे.