Join us

Crop Damage :अकोला जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट; शेतकरी हतबल ! अकोला जिल्ह्यात काय परिस्थिती आढावा घेऊया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2024 6:05 PM

अकोला जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट आल्याने शेतांमध्ये पाणीच पाणी, खरिपातील पिके पडली पिवळी, तणही वाढले आहे पिकांवर फवारणीचा फायदा होईना. आढावा घेऊया जिल्ह्यात काय परिस्थिती आहे. (Crop Damage)

गणेश उमाळे / अनिस शेख

यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांवर सातत्याने संकटाची मालिका सुरु आहे. सुरुवातीपासून सतत पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र पिकाला शेंगाच लागल्या नाही. या पावसामुळे कपाशी पिकाची वाढ झाली आहे. बहुतांश भागात कपाशीचे पीक एक-दीड फुटापर्यंतच वाढले आहे.  काही ठिकाणी पीक चांगले आहे;  मात्र त्याला बोंडेच नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

या पावसाळ्यात पावसाचे दिवस अधिक असल्याने पिकांवर सावट रोगराई वाढली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च केला. ऑगस्ट उलटूनही पाऊस सुरूच असल्याने ओल्या दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

महान येथे काय परिस्थिती 

हंगामाच्या सुरुवातीला कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद, मूग ज्वारीसह अन्य पिके चांगल्या अवस्थेत होती. परंतु गेल्या ऑगस्टमध्ये महिनाभर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना डवरणी, निंदणी, डुबे, आंतरमशागतीसह फवारणी करता आली नाही. 

आताही अर्ध्याहून अधिक पिके पाण्यात आहेत. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या परिसरात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. यंदा पावसामुळे पिकांना दहा पटीने अधिक खर्च करावा लागला, तर अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन शेताला खर्च लावला.

परंतु सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक रोगाने ग्रासले आहेत, पिकाला अपेक्षित शेंगा लागल्या नाहीत. यलो मोझॅक रोगामुळे पिके नष्ट होत असल्याचे दिसत आहे. पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने शेतामधून पाण्याचे पाझार सुरू झाले. तर कपाशी पिकावर रोगराई पसरल्याने अल्प प्रमाणात बोंडे लागली असून, झाडे पिवळी पडली आहेत. पिकाला लागलेला खर्च निघणार की नाही, याची काळजी शेतकऱ्यांना लागली आहे

शेतकरी काय म्हणतात..... 

यावर्षी सोयाबीन, तूर, कपाशीची लागवड केली आहे. सुरुवातीला पीक खूप चांगल्या प्रकारे दिसत होते. परंतु ऑगस्टमध्ये सतत पाऊस झाल्याने पिकांची नासाडी झाली.- सुनील जानूनकर, शेतकरी, महान

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सोयाबीनची १२ एकरांत पेरणी केली आहे. मात्र, ऑगस्टमध्ये सतत झालेल्या पावसामुळे पिकांवर फवारणी करता आली नाही. परिणामी, अनेक रोगांनी आक्रमण केल्याने पिके पिवळी पडली असून, उत्पन्नात घट येण्याचे चित्र समोर दिसत आहे. - अब्दुल रशीद शेख, शेतकरी, महान

 जूनमध्ये सोयाबीन पिकाची पेरणी केली होती. सुरुवातीला पिके चांगल्या प्रकारे दिसत होती; मात्र सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला अल्प प्रमाणात शेंगा लागल्या असुन, पिकाला लावलेला खर्च ही निघते की नाही, अशी चिंता आहे. - सुरेश शेवलकर, शेतकरी, महान

यावर्षी कपाशी पिकाला प्राधान्य दिले. पावसाची चिंता न करता खर्च करून वेळोवेळी कपाशी पिकाला रासायनिक खते, डुब्याचा फेर, निंदणीसह अन्य कामे केली. परंतु महिनाभर सारखा पडलेल्या पावसामुळे पिकाची बिकट परिस्थिती झाली आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.-रवी महागावकर, शेतकरी, महान

या वर्षी सोयाबीन पिकास प्राधान्य दिले असून, जुलै अखेर सोयाबीनची पिके चांगल्या अवस्थेत दिसत होते. ऑगस्टमध्ये महिनाभर झालेल्या पावसामुळे शेतातील कोणतेही काम होऊ शकले नाही. त्यामुळे पिकावर अनेक रोगाने आक्रमण केल्याने पिकाची परिस्थिती खालवली असून, याचा फटका उत्पादनावर पडण्याची शक्यताआहे.-  सरफराज खान चाँद खान, शेतकरी, महान

डोंगरगावात कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी

 डोंगरगाव तालुक्यातील मासा, सिसा, उदेगाव परिसरात हुमणी अळीचे आक्रमण वाढल्याने सोयाबीन धोक्यात सापडले होते. यासंदर्भात शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त भागात पाहणी करून मदतीची मागणी निवेदनाद्वारे केली होती. अखेर तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरूणकर यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. 

परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती देत पेरणी केली आहे. मासा, सिसा, उदेगाव परिसरात हुमणी अळीचे आक्रमण वाढल्यामुळे नुकसान होत आहे. या भागांत पाहणी करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.

यासंदर्भात 'लोकमत ऍग्रो'ने बातमी प्रकाशित करीत लक्ष वेधले. अखेर तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरूणकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटक शास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ, राऊत, कृषी सहायक सदार यांनी पाहणी केली.

केळीवेळी परिसरातील पिकांचे नुकसान

केळीवेळी येथील दहीहंडा महसूल मंडळांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काटी-पाटी, धारेल, गिरजापूर, जऊळखेड शिवारात सतत पाऊस सुरूच असल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत.

शेतशिवाराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून, पिके सडून नष्ट होत आहेत. त्यामुळे यंदाही उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता शेतकन्यांनी वर्तविली आहे. खारपाण पट्टयात येत असलेल्या चोहोट्टा मंडळांतर्गत केळीवेळी, गिरजापूर, धारेल तसेच दहीहांडा मंडळांतर्गत काटी-पाटी, जऊळखेड शिवारात अतिवृष्टी झाल्याने मूग, उडीद, सोयाबीन पिके पाण्यात बुडाली आहेत.

परिसरात यंदा शेतकऱ्यांनी कपाशीला पसंती दिल्याने पेरा वाढला आहे. परंतु गेल्या महिनाभरापासून पाऊस सुरूच असल्याने कपाशीची वाढ खुंटली आहे. पिके पिवळी पडली असून, शेतकरी चिंतीत आहे. नुकसानग्रस्त भागात त्वरित पंचनामे करून मदत देण्याची मागणी होत आहे.

अद्याप नुकसानग्रस्त भागात पंचनामे नाही! 

चोहोट्टा बाजार, दहीहंडा महसूल मंडळांतर्गत अतिवृष्टी झाली आहे. पिके पाण्यात गेली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. असे असतानाही परिसरातील नुकसानग्रस्त भागात पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. परिसरात बहुतांश शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. अतिवृष्टी झाल्यानंतर नुकसानीची तक्रारही कंपनीकडे करण्यात आली आहे. परंतु अद्यापही सर्वेक्षण झाले नाही.

धारेल शिवारात सात एकर शेती असून, सततच्या पावसामुळे उभ्या पिकात पाणी साचले आहे. पिकावर खर्च केला होता. मात्र, खर्च पाण्यात गेला आहे. नुकसानग्रस्त भागात सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी. - सूरज बुले, शेतकरी, केळीवेळी.

पाच एकर क्षेत्रात कपाशीची पेरणी केली होती. खाते, डवरणी, फवारणीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला. अतिवृष्टीमुळे लेंडी नाल्याला पूर आल्यामुळे शेतातील उभे पीक खरडून गेले, नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून भरपाई द्यावी.- सागर वाघमारे, शेतकरी, केळीवेळी

दहा एकर क्षेत्रात मूग, कपाशी पेरणी केली होती. पेरणीपासूनच पाऊस सुरू असल्याने पिकात पाणीच पाणी साचले आहे. उभे पीक जागेवरच सडले आहे. लागवडीचा खर्चही पाण्यात गेल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.  परिसरात अद्याप नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्यात आले नाहीत. -शफीउल्ला शहा, शेतकरी काटी.

शेती पूर्णा नदीकाठावर असून, कपाशीची लागवड केली होती. दि. २ सहेंबर रोजी आलेल्या पुरामुळे पीक पाण्यात गेले आहे. त्यामुळे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात असून, शासनाने मदत करावी. - भरत चाऱ्हाटे, शेतकरी, काटी

सततच्या पावसामुळे पिकांवर परिणाम चिंता वाढली! आगर : दोन महिन्यांपासून सतत पाऊस सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसला असून, शेतीला लावलेला खर्चही निघणार की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेऊन खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागत केली.

मृग नक्षत्रात थोडाफार पाऊस सुरू होताच काही शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली होती. दोन-तीन दिवसांच्या खंडानंतर पुन्हा दमदार पाऊस झाला व पेरणीला प्रारंभ झाला. खरीप हंगामातील कपाशी व सोयाबीन बियाण्याची पेरणी होत असतानाच जुलैमध्ये दमदार पावसाने थैमान घातले व नदी नाल्यांच्या काठावरील पिके उदध्वस्त झाली.

उर्वरित शेतातील पिके चांगल्या अवस्थेत दिसत असतानाच एक आठवडा वगळता गेल्या दोन महिन्यांपासून सारखा पाऊस सुरू आहे. यामुळे सोयाबीन पिकाची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. सोयाबीन झाडांची उंची तीन-साडेतीन फुटांची आहे.

फुलोरा अवस्थेत असताना सारखा पाऊस सुरू असल्याने शेंगा भरल्या नाहीत. त्यामुळे पिकाला केलेला खर्चही निघणार नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कर्जाचे ओझे कमी करणे गरजेचे

सखल भागात पाणी साचल्याने शेतातील कपाशीचे पीक बुडीत खात्यात जमा आहे. ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याने शेतकयांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे शेतीला लावलेला खर्चही निघाला नसल्याने अनेक शेतकरी कर्जात बुडाले आहेत. अशा शेतकऱ्यांना शासनाने दिलासा म्हणून कर्जाचे ओझे कमी करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रपीकपीक विमापाऊसशेतकरीशेतीअकोला