Crop Insurance 2024 : राज्य शासनाने जून-२०२३ मध्ये सर्वसमावेशक पीकविमा योजना सुरू केली. शेतकऱ्यांना खरीप हंगाम प्रमाणे रब्बी हंगामातही केवळ एक रुपया भरून पीकविमा योजनेत सहभागी होता येणार आहे. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२४ पर्यंत गहू, कांदा व हरभरा यासाठी पीकविमा काढता येणार आहे.
राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा योजनेला सुरुवात केली आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीकविमा योजनेंतर्गत मदत मिळू शकणार आहे.
अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पीकविमा काढून घेणे फायद्याचे ठरणार आहे. शेतकऱ्यांनी वेळेवर पीकविमा अर्ज व्यवस्थित भरावा, यामुळे अडचण येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
वणी तालुक्यात पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बी पिकांवर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची नुकसान भरपाई करून घेण्यासाठी पीकविमा भरणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांना १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत गहू, कांदा, हरभरा तर रब्बी ज्वारी ३० नोव्हेंबरपर्यंत तर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकांना ३१ मार्च २०२५ पर्यंत पिकांचा पीकविमा भरता येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर
खरीप हंगामात शेतकऱ्यांनी एका पिकासाठी एक रुपया देऊन विमा भरला होता. शेतकऱ्यांचा प्रीमियम केंद्र व राज्य शासनाने पीकविमा कंपनीला दिला आहे. त्यामुळे अग्रिमची रक्कम शेतकऱ्यांना मिळत आहे. सर्व अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसार रब्बीत देखील शेतकऱ्यांना विमा रक्कम दिली जाणार आहे.
सीएससीवर भरता येईल अर्ज
■ रब्बी हंगामातील पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन शेतकरी पीकविमा अर्ज भरू शकतात. बँका, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र (CSC) यांच्यामार्फत ही पीकविमा अर्ज दाखल करता येऊ शकतो.
पीकविमा नोंदणीची अंतिम तारीख
रब्बी ज्वारी : ३० नोव्हेंबर २०२४
बागायती गहू, हरभरा, कांदा व अन्य पिके : १५ डिसेंबर २०२४
उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग : ३१ मार्च २०२५