पुणे : राज्यात मान्सूनचा पाऊस पडल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या आणि लागवडी केलेल्या आहेत. तर अनेक शेतकऱ्यांनी कमी पावसामुळे अद्याप पेरण्या केल्या नाहीत. तर यंदाच्या हंगामातील पिकविमा अर्ज सुरू करण्यात आले असून अनेक शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत पीकविमा भरला आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, राज्य सरकारने शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी १ रूपयांत पीकविमा योजना सुरू केली होती. यामध्ये शेतकऱ्यांना विमाहप्त्यापोटी केवळ १ रूपया एवढी किंमत भरावी लागणार आहे. तर उर्वरित रक्कम राज्य शासनाच्या तिजोरीतून विमा कंपन्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळत असून यंदाच्या म्हणजेच २०२४ मधील खरीप हंगामात आत्तापर्यंत म्हणजेच १८ जून अखेर १ लाख ४२ हजार ९८३ शेतकऱ्यांनी विमा काढला आहे.
तर ९४ हजार ८४४ हेक्टर क्षेत्र पीकविम्याच्या संरक्षणाखाली आले आहे. अर्ज केलेल्या विम्यापोटी विमा संरक्षित रक्कम ही ४६६ कोटी रूपये एवढी आहे. तर प्रती अर्ज १ रूपयाप्रमाणे विमा हप्ता हा १ लाख ४२ हजार ९८३ रूपये जमा झाला आहे. तर आत्तापर्यंत जमा झालेल्या विमा अर्जासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा हप्त्यापोटीचा हिस्सा हा ७६ कोटी एवढा आहे.
अंतिम मुदतविमा भरण्यासाठी अंतिम मुदत ही १५ जुलै ही असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.