पुणे : पिकविमा आणि विम्याची नुकसान भरपाई ही अत्यंत क्लिष्ट आणि शेतकऱ्यांना सहज न समजणारी प्रक्रिया आहे. बहुतांश शेतकऱ्यांना पीकविमा कसा भरावा, ई-पीक पाहणी कशी करावी, नुकसानीची तक्रार कशी करावी यासंदर्भात माहिती नसते. पण परभणी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी पीक विमा चळवळ सरू केली असून या माध्यमातून गावोगावांतील शेतकऱ्यांना पिकविम्याची माहिती दिली जात आहे.
(Crop Insurance in Maharashtra)
दरम्यान, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथील डॉ. सुभाष लांडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून मागील ७ ते ८ वर्षांपासून परभणी जिल्ह्यात पिकविमा चळवळ सुरू करण्यात आली आहे. त्या माध्यमातून त्यांनी आत्तापर्यंत ६५० पेक्षा जास्त गावांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. यामुळे गावाखेड्यांतील लोकांमध्ये पिकविम्याच्या संदर्भात जागृती झाली आहे.
काय आहे चळवळीचे स्वरूप?
प्रत्येक गावामध्ये जाऊन तेथील शेतकऱ्यांना एकत्र बोलावून पिकविम्याची माहिती दिली जाते. शेतकऱ्यांनी पीक विमा कसा भरावा, ई-पीक पाहणी कशी करावी, नुकसानीची तक्रार कशी करावी, पिकविमा मिळाला नाही तर त्याची तक्रार कुठे करावी यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात येते.
काय झाला फायदा?
या शेतकऱ्यांनी या चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकविम्यासंदर्भात जागृत केले आहे. यामुळे २०२१ खरिप हंगामातील सोयाबीन उत्पादकांना पिकविमा देण्यास कंपनीने नकार दिल्यानंतर या शेतकऱ्यांनी दिल्लीपर्यंत प्रशासकीय लढा दिला आणि परभणी जिल्ह्यासाठी २ लाख २० हजार शेतकऱ्यांचे २२४ कोटी रूपये मंजूर करून घेतले. शेतकरी विम्यासंदर्भात जागृत असल्यामुळे हा फायदा झाल्याचं चळवळीचे प्रमुख डॉ. सुभाष कदम सांगतात.
शेतकऱ्यांना विम्यासंदर्भात जागृत करण्यामध्ये डॉ. सुभाष कदम यांना हेमचंद्र शिंदे, गोविंद लांडगे, विश्वंभर गोरवे, भगवान करंजे, लहूकुमार शेळके, कृष्णा सोळंके, शिवाजी दिवटे, माधवराव चव्हाण यांची मोलाची साथ लाभली आहे.
आत्तापर्यंत आम्ही ६५० गावांतील लाखों शेतकऱ्यांना पिकविम्यासंदर्भात जागृत केले आहे. यामुळे शेतकरी सजग झाले आहेत. यामुळेच आम्ही २०२१ मधील पिकविम्याची थकीत रक्कम ४ वर्षे प्रशासकीय लढा लढून मिळवून दिली आहे. २ लाख २० हजार शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे यामुळे मिळाले आहेत.
- डॉ. सुभाष कदम (पिकविमा चळवळ, परभणी)