अमरावती जिल्हयात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित पीकविमा कंपनीकडे बाधित ७ लाख ५३ हजार ६१० शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पूर्वसूचना दाखल केल्या आहेत.
अद्यापही कंपनींच्या सर्व्हेव्दारे ५.६२ लाख शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्राचा सर्व्हे केलेला नाही. अमरावती विभागात यंदा ३० लाख हेक्टरमध्ये खरिपाच्या पेरणी आटोपल्या आहेत. त्यातच एक रुपयामध्ये पीकविम्यात सहभाग घेता येत असल्याने विभागातील २८.७२ लाख शेतकऱ्यांनी पीकविम्यात सहभाग घेतला आहे.
त्यातच पावसाची सरासरी १२१ टक्क्यांवर पोहोचली आहे. जुलै महिन्यापासून सुरू झालेली पावसाची रिपरिप अद्याप थांबलेली नाही. मुसळधार पाऊस, अतिवृष्टीने नदी-नाल्यांना पूर येऊन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
शिवाय शेतात पाणी साचूनही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे विहित मुदतीत म्हणजेच नुकसान झाल्याचे ७२ तासांच्या आत विभागातील ७ लाख ५३ हजार ६१० शेतकऱ्यांनी संबंधित पीकविमा कंपनीकडे पूर्वसूचना अर्ज दाखल केलेले आहेत. कंपनीद्वारा सर्व्हे करण्यात येऊन पीकविम्याचा परतावा देण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
अद्याप ५.६२ लाख पूर्वसूचनांचा सर्व्हे प्रलंबित
१) बाधित पिकांसाठी अमरावती जिल्ह्यात ६५,२१९, यवतमाळ २,८२,०६६, अकोला ७६,३४६, वाशिम १,१४,०७७ व बुलढाणा जिल्ह्यात २,१५,९०२ पूर्वसूचना पीकविमा कंपनीकडे दाखल आहेत.
२) कंपनीद्वारा १,९१,४५८ अर्जाचा सर्व्हे करण्यात आला. अद्याप अमरावती जिल्ह्यात ३४,१३५, यवतमाळ १,९२,६२७, अकोला ३२,६०७, वाशिम १,०१,८०४ व बुलढाणा जिल्ह्यात २,००,९७९ पूर्वसूचनांचा सर्व्हे प्रलंबित आहेत.