Join us

Crop Insurance : जिल्हाधिकाऱ्यांचे विमा कंपनीला आदेश ; सोयाबीनला 'इतके' टक्के विमा मंजूर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 4:27 PM

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता नुकसानीची अग्रिम रक्कम मिळणार आहे. विमा कंपनीला काय दिले आदेश ते वाचा सविस्तर Crop Insurance :

Crop Insurance : 

हिंगोली: 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत अधिसूचना जारी करण्यात आली असून, त्यानुसार जिल्ह्यातील सोयाबीन पिकासाठी संभाव्य नुकसान भरपाईच्या २५ टक्के आगाऊ रक्कम सर्व विमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी एच.डी.एफ.सी. इरगो कंपनीला दिले आहेत.

त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता नुकसानीची अग्रिम रक्कम मिळणार आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. हंगाम हाती येण्याची शक्यताही मावळली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत झालेले नुकसान ही जोखीम लागू करण्यासाठी १३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक पार पडली.

क्षेत्रीय स्तरावरील संयुक्त समितीच्या सर्वेक्षणानुसार सोयाबीन पिकाचे नजर अंदाजानुसार अपेक्षित उत्पादन हे मागील ७ वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आल्याचे निदर्शनास आले, तसेच सर्व महसूल मंडळांमध्ये सोयाबीन पिकामध्ये मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती लागू होत असल्याचे निदर्शनास आले.

त्यानुसार जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी १६ सप्टेंबर रोजी अधिसूचना काढून पीक विमा कंपनीस सोयाबीन पिकामध्ये मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती लागू होत असून, सर्व विमाधारकांना पीक नुकसानीच्या प्रमाणात विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्के अग्रिम देण्याचे आदेश दिले आहेत.

सोयाबीन पिकासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केल्याने जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून संभाव्य नुकसानीच्या २५ टक्के रक्कम अग्रिम रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एक महिन्याच्या आत रक्कम

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी यांच्या मार्फत नुकसानीचा अहवाल व अधिसूचना जाहीर झाल्यानंतर एक महिन्याच्या आत तरतुदीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल, तसेच बैठकीतील चर्चेनुसार प्राप्त सर्वेक्षण अहवालानुसार अधिसूचित पीक विमा क्षेत्रातील सोयाबीन पिकासाठी संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम सर्व विमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेश एचडीएफसी इरगो कंपनीला जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या मान्यतेने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत.

तूर, कापसात दिसली नाही घट

संयुक्त्त समितीच्या सर्वेक्षणानुसार तूर आणि कापूस या दोन पिकांच्या नजर अंदाजानुसार अपेक्षित उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट दिसून आली नाही, असेही जिल्हा समितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.

३ लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित

जिल्ह्यात ४ लाख ७२ हजार १५ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, खरीप ज्वारी आदी पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे. ३ लाख १२ हजार २१७ हेक्टर क्षेत्रावरील पिके संरक्षित करण्यात आली आहेत. कापूस आणि सोयाबीन या दोन महत्त्वाच्या पिकांचा विमा सर्वाधिक शेतकऱ्यांनी उतरविला आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनपीक विमाशेतकरीशेतीहवामान