पुणे : खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांनी पेरण्यांची तयारी सुरू केली आहे. पण अद्याप मागच्या वर्षीच्या म्हणजे २०२३ च्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईची पूर्ण रक्कमसुद्धा विमा कंपन्यांकडून पूर्णपणे शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यातुलनेत विमा कंपन्या मात्र सरकारच्या पैशावर मालामाल झाल्याचे चित्र समोर आले आहे.
दरम्यान, मागच्या वर्षी राज्यात पावसाने दडी मारल्याने ४० तालुक्यांत आणि अनेक मंडळात सरकारने दुष्काळ जाहीर केला. त्याव्यतिरिक्त बऱ्याच भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. पावसात २१ दिवसांचा खंड पडूनही अनेक कंपन्या कोणत्या ना कोणत्या कारणावरून अग्रीम विमा भरपाईची २५ टक्के रक्कम देण्यास नकार देत होत्या.
कृषी मंत्र्यांनी आदेश देऊनही विमा कंपन्यांकडून दिवाळीअगोदर शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची अग्रीमची रक्कम देण्यात आली नव्हती. पण मागच्या हंगामातील पूर्ण विमा संरक्षित रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही हे वास्तव आहे. नुकसान भरपाईची रक्कमही तोकडीच असल्यामुळे शेतकऱ्यांना तोटाच होतो.
कृषी विभागाच्या ११ जून २०२४ रोजीच्या आकडेवारीनुसार विमा कंपन्यांना सरकारकडून एकूण विमा हप्त्याचे ८ हजार १५.३९ कोटी रूपये मिळाले असून निश्चित नुकसान भरपाईची रक्कम ही ४ हजार ३०१ कोटी रूपये एवढी आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ९ विमा कंपन्या या ३ हजार ७१४ कोटी रूपयांनी नफ्यात आहेत. पण अद्यापही या कंपन्यांकडे शेतकऱ्यांचे ७८५.६० कोटी रूपये देणे बाकी आहे.
कृषी विभागाची ११ जून रोजीची आकडेवारी
अ. क्र. | विमा कंपनी | एकूण विमा हफ्ता रक्कम (रू. कोटी) | निश्चित नुकसान भरपाई रक्कम (रू. कोटी) | वितरीत नुकसान भरपाई रक्कम (रू. कोटी) | प्रलंबित नुकसान भरपाई रक्कम (रू. कोटी) | प्रलंबित रक्कम देऊनही विमा कंपन्यांचा नफा (रू. कोटी) |
१ | भारतीय कृषी विमा कंपनी | १३४७.५३ | ९४०.२० | ५७७.७९ | ३६२.४१ | ४०७.३३ |
२ | चोरामंडलम ज. इं. कं. लि. | ४७१.५६ | २२२.८१ | २२१.४४ | १.३७ | २४८.७५ |
३ | एचडीएफसी ज. इं. कं. लि. | १३८५.५९ | ७१४.८९ | ६९६.५१ | १८.३८ | ६७०.७० |
४ | आयसीआयसीआय लो. इं. कं. लि. | १०६०.६५ | ५३२.७४ | ५२०.५३ | १२.२२ | ५२७.९१ |
५ | ओरिएन्टल इंन्शुरन्स कं. लि. | १३०१.८८ | ६१६.८५ | ४६९.५३ | १४७.३२ | ६८५.०३ |
६ | रिलायन्स ज. इं. कं. लि. | ९३५.६७ | २८७.६१ | २८५.६४ | १.९७ | ६४८.०६ |
७ | एसबीआय ज. इं. कं. लि. | ३४४.०१ | २८६.९१ | २१३.१९ | ७३.७२ | ५७.१० |
८ | युनायटेड इंडिया इं. कंपनी | ६७८.६२ | ४४९.८५ | २८९.८० | १६०.०६ | २२८.७७ |
९ | युनिव्हर्सल सोम्पो ज. इं. कं. लि. | ४८९.८८ | २४९.५३ | २४१.३६ | ८.१७ | २४०.३५ |
एकूण | ८०१५.३९ | ४३०१.३९ | ३५१५.७९ | ७८५.६० | ३७१४ कोटी |
ही निश्चित नुकसान भरपाईची रक्कम अंतिम नाहीये. मागच्या वर्षीचा खरीप हंगाम फेब्रुवारीमध्ये संपल्यामुळे विमा भरपाई रक्कमेची प्रक्रिया ही जूनपर्यंत चालेल. विविध स्तरावर 'पीक कापणी प्रयोग' केले जात असल्यामुळे टप्प्याटप्प्याने निश्चित विमा नुकसान भरपाईची रक्कम वाढते. त्यानुसार विमा कंपन्या भरपाईची रक्कम वाटप करत असतात किंवा त्यावर आक्षेप नोंदवत असतात. अंतिम नुकसान भरपाईची रक्कम ही ६ हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.- श्री. विनयकुमार आवटे (सहसंचालक, विप्र, कृषी आयुक्तालय)