प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान याअंतर्गत जिल्ह्यातील बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर या अधिसूचित पिकांकरिता संभाव्य विमा नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स विमा कंपनीला जारी केले आहेत.
राज्य सरकारचे अधिकारी आणि विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीनुसार बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर या पिकांचे अपेक्षित उत्पादन हे त्या पिकाच्या मागील वर्षांच्या सरासरी ७ उत्पादनाच्या ५० टक्क्यापेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार महसूल मंडळ गटातील सर्व पीक विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम १ महिन्याच्या आत त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीक विमाधारक शेतकऱ्यांना विमा कंपनीने नुकसान भरपाई अदा केल्यानंतर पीक हंगामाच्या शेवटी उत्पादनाच्या आधारे निश्चित होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पात्र राहतील व नुकसान भरपाईची आगाऊ रक्कम ही अंतिम येणाऱ्या नुकसान भरपाईतून समायोजित करण्यात येईल.