हिंगोली जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे संगणकीकरणाची प्रक्रिया सुरू असून, आत्तापर्यंत १६६ सोसायट्यांत 'सीएससी' केंद्रही सुरू करण्यात आले आहे. यातील ३९ सोसायटींनी ३ हजार ६८० शेतकऱ्यांचा पीकविमा काढला आहे.
शेतकऱ्यांना गावातच ऑनलाइन सेवा उपलब्ध व्हावी तसेच सोसायट्यांनाही आर्थिक बळ मिळावे यासाठी संगणकीकरण केले जात आहे. मागील दोन महिन्यांपासून या प्रक्रियेला वेग आला असून, गत आठवड्यात जिल्ह्यातील १०१ सोसायटींच्या गट सचिवांना 'सीएससी' केंद्राच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवांसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.
सध्या शेतकऱ्यांची पीकविमा काढण्यासाठी लगबग सुरू आहे. पीकविमा काढण्यासाठी बहुतांश गावातील शेतकऱ्यांना शहराच्या ठिकाणी यावे लागते. मात्र, सेवा सहकारी सोसायटीच्या सीएससी केंद्रात पीकविमा भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाचला आहे. जिल्ह्यातील ३९ सोसायटींनी ३ हजार ६८० सभासद शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा उतरविला आहे. प्रती शेतकरी एक रुपयात हा विमा काढण्यात आला.
दरम्यान, जिल्ह्यात १६६ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटींचे संगणकीकरण जवळपास पूर्णत्वाकडे असून, सध्या ३९ ठिकाणी काम सुरू झाले आहे. उर्वरित सोसायटींमध्येही लवकरच ऑनलाइन सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसाही वाचला...
■ पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते.
■ परंतु, ३९ सोसायटींनी शेतकऱ्यांचा गावाचा पिकविमा काढल्याने त्या शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसाही वाचला आहे.
■ सोसायटीतील सीएससी केंद्रात एक रुपयांत पीकविमा काढून देण्यात आला.