Crop Insurance :
जयेश निरपळ :
गंगापूर जिल्ह्यातील ४ लाख ४१ हजार ८२२ शेतकऱ्यांनी ११ लाख ३८ हजार ७४४ अर्जाद्वारे एकूण ४ लाख ४० हजार ७४५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा या वर्षी विमा काढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या काही प्रमाणात घट झाली आहे.
बळीराजा आणि नैसर्गिक आपत्ती हे जणू समीकरणच झाले. शेतकऱ्यांना दरवर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असल्याने अनेकदा तोंडाशी आलेला घासही हिरावला जातो.
त्यामुळे जीवापाड जपलेल्या शेतीपिकांना विम्याचे कवच मिळावे, याकरिता शासनाने गेल्या वर्षीपासून १ रुपयात पीकविमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानुसार शासनाने १ ऑगस्टपर्यंत पीकविमा काढण्यास मुदत दिली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ४ लाख ४१ हजार ८२२ शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांना विम्याचे कवच दिले आहे.
गेल्यावर्षी दुष्काळाने मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले होते; मात्र बळीराजाला पाहिजे, त्या प्रमाणात नुकसानभरपाई मिळाली नव्हती. यंदा आतापर्यंत देखील अपेक्षित असा समाधानकारक पाऊस न झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खबरदारीची उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांनी नाइलाजाने पीकविमा
काढण्याला महत्त्व दिले असले तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत त्यात काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे.
मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांचा कल कमी
• गेल्यावर्षी राज्य शासनाच्या वतीने पहिल्यांदाच एक रुपयात पीकविमा योजना राबविण्यात आली होती. त्याला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.
• मागील वर्षी ४ लाख ४८ हजार २७३ शेतकऱ्यांचे ११ लाख ५२ हजार ६९४ हजार अर्ज प्राप्त झाले होते. याद्वारे जिल्ह्यातील ४ लाख ४९ हजार ४३३ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होते; मात्र मागील दुष्काळात बळीराजाला पीकविम्याची पाहिजे त्या प्रमाणात नुकसानभरपाई न मिळाल्याने यंदा काही प्रमाणात शेतकऱ्यांनी पीकविमा काढण्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे.
दोन वेळा मुदतवाढ
• पिकविमा काढण्यासाठी सुरुवातीला १५ जुलै ही शेवटची तारीख देण्यात आली होती; मात्र 'लाडकी बहीण योजने' मुळे शेतकऱ्यांनी पीकविमा काढण्याकडे दुर्लक्ष केल्याने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
• त्यानंतर शेवटच्या दिवशी पुन्हा एक दिवसाची मुदत वाढून १ ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारले गेले.
पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची तालुकानिहाय आकडेवारी
तालुका | शेतकरी | अर्ज संख्या | क्षेत्र (हेक्टर) |
छ. संभाजीनगर | ३३,२२४ | ८०,४४० | ३९,४३४.४५ |
गंगापूर | ५९,६१७ | १,३६,७०६ | ७९,१९९.९३ |
कन्नड | ६७,६०७ | १,५५,०५२ | ७५,९५४.८८ |
खुलताबाद | २०,१८० | ५८,९६४ | २६,१५६.५५ |
पैठण | ४९,९३८ | १,२२,५५८ | ६२,८२३.९९ |
फुलंब्री | ३४,४१५ | ८९,००० | ३८,४२८.८५ |
सिल्लोड | ६६,४७८ | १,८९,६५२ | ८०,८५४.०५ |
सोयगाव | २३,८७६ | ४४,१०९ | ३७,८९२.३५ |
वैजापूर | ८६,४८७ | २,६२,२६३ | १,१०,६५३.३० |
एकूण | ४,४१,८२२ | ११,३८,७४४ | ४,४०,७४५.०५ |
दोन वर्षांची पीकविमा आकडेवारी
वर्ष | शेतकरी | अर्ज | क्षेत्र (हेक्टर) |
खरीप २०२३ | ४.४८,२७३ | ११,५२,६९४ | ४,४९,४३३.४० |
खरीप २०२४ | ४,४१,८२२ | ११,३८,७४४ | ४,४०,७४५.०५ |
तफावत (घट) | ६,४५१ | १,३९५० | ८,६८८.३५ |