Pune : राज्यातील शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी एक रूपयांत पीक विमा योजनेचा लाभ घेतला होता. पण अद्यापही मागच्या खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीचा विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही. कृषी आयुक्तालयाकडून मिळालेल्या अद्ययावत माहितीच्या आधारानुसार रब्बी हंगाम २०२३-२४ या हंगामातील शेतकऱ्यांना २३७ कोटी रूपयांची विमा भरपाई देणे बाकी आहे.
अधिक माहितीनुसार, रब्बी हंगामासाठी ९ विमा कंपन्या राज्य सरकारने नियमित केल्या होत्या. हंगामातील विमा हप्त्यापोटी सरकारला २ हजार १२५ कोटी रूपये कंपन्यांना द्यावे लागले आहेत. तर नुकसान भरपाईची रक्कम ही केवळ ६४० कोटी रूपये एवढी होती. त्यातील केवळ ४०३ कोटी रूपयांची रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आली आहे.
तर शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांची २३७ कोटी रूपये नुकसान भरपाई बाकी आहे. यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबीसाठी ४९ कोटी, काढणी पश्चात नुकसानीपोटी १२३ कोटी आणि पिक कापणी प्रयोगावर आधारित ६४ कोटी रूपयांची नुकसान भरपाई देणे बाकी आहे.
दुसऱ्या वर्षीचा रब्बी हंगाम आता सुरू झाला असून अद्यापही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. तर शेतकऱ्यांना केवळ एका रूपयांत पीक विमा योजना देऊन विमा भरपाई वेळेवर का दिली जात नाही असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.