मागील चार दिवसांत धाराशिव जिल्ह्याच्या काही भागांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. नद्या-नाल्यांनी पात्र सोडल्याने पाणी शेतात शिरूनही पिकांचे नुकसान झाल्याचे पाहावयास मिळत आहे. या प्रकारे शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसानीची पूर्वसूचना ७२ तासांच्या आतच विमा कंपनीला द्यावी, तरच संपूर्ण भरपाई मिळू शकणार आहे.
ऑगस्ट महिन्यातील तीन आठवडे पावसाची जिल्ह्याकडे पाठ होती. मात्र, मागील चार दिवसांत जोरदार पाऊस होत आहे. अतिवृष्टीचीही नोंद झाली आहे. 'मांजरा' तसेच 'तेरणा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. नद्यांनी पात्र सोडल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले.
यामुळे पिकांचे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांनी तातडीने ७२ तासांच्या आत विमा कंपनीला पूर्वसूचना द्यावी, तरच ते संपूर्ण भरपाईला पात्र ठरू शकतील.
किती जणांनी भरला यंदा विमा
चालू वर्षीच्या खरीप हंगामात धाराशिव जिल्ह्यातून ७ लाख १९ हजार १६७ अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी आपली खरीप पिके विमा संरक्षित केली आहेत. यापोटी कंपनीला शेतकरी, राज्य व केंद्र शासनाच्या हिश्श्यापोटी ६१५ कोटी रुपये मिळणार आहेत.
१५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण भरपाई
शेती पिकांचे नुकसान झाल्यास पीक कापणी कालावधीच्या अगोदर १५ दिवस म्हणजेच, १५ सप्टेंबरच्या आतील पूर्वसूचनांना संपूर्ण भरपाई मिळू शकते. त्यानंतरच्या पूर्वसूचनांना ५० टक्के भारांकनाचा निकष लागू होतो, अशी माहिती पीकविमा अभ्यासक अनिल जगताप यांनी दिली.
पीक कापणी कालावधीचा फटका
मागील काही वर्षांत परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले होते. तेव्हा पिके काढून झाली होती, असा पवित्रा विमा कंपन्यांनी घेत भरपाई ५० टक्केच जाहीर केली होती. प्रत्यक्षात सोयाबीन पीक कापणी कालावधी १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर असा होता. मात्र, आता १ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर असा कापणी कालावधी केला आहे. त्याचा फटका बसतो आहे.
असे ठरवले जाते भारांकन
यावर्षीच्या कापणी कालावधीनुसार १५ सप्टेंबरपर्यंतच्या पूर्वसूचनांना संपूर्ण भरपाई मिळेल. १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीतील नुकसानीला ५० टक्के भारांकन लागते. यानंतरच्या कालावधीत काढणी पश्चातचा निकष लागून मंडळातील सरासरी नुकसानीनुसार भरपाई मिळते.
कृषी आयुक्तांकडे तक्रार : जगताप
सोयाबीनचा पीक कापणी कालावधी १५ दिवस अलीकडे आणल्याने नुकसानभरपाई मिळवताना शेतकऱ्यांना फटका बसत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, कृषिमंत्री, कृषी आयुक्तांकडे तक्रार करणार असून, हा कालावधी पूर्ववत १५ ऑक्टोबर ते १५ नोंव्हेबर असा ठेवावा, अशी मागणी अनिल जगताप यांची आहे.