Pune : केंद्र सरकारने फळपिकांना विम्याचे संरक्षण मिळण्यासाठी हवामान आधारित फळ पिक विमा योजना आंबिया बहार २०२४-२५ मध्ये लागू केली आहे. ही फळपीक योजना द्राक्ष, स्ट्रॉबेरी, केळी, मोसंबी, आंबा, काजू, संत्रा, पपई, डाळिंब या पिकांसाठी लागू असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आंबिया बहरासाठी फळपीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, यंदाच्या म्हणजेच २०२४ सालच्या आंबिया बहरासाठी आतापर्यंत १ लाख ७३ हजार १२९ शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केले आहेत. तर गेल्यावर्षीच्या आंबिया बहरासाठी हंगामाअखेर २ लाख ३१ हजार २२२ शेतकऱ्यांनी विमा अर्ज केले होते. अनेक फळपिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत संपलेली असून केवळ काजू, संत्रा, कोकणातील आंबा आणि डाळिंब या पिकांचा विमा अर्ज भरणे सुरू आहे.
कृषी आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, काजू, संत्रा आणि कोकणातील आंबा पिकासाठी पीक विमा भरण्याची अंतिम मुदत ही ३० नोव्हेंबर २०२४ असून यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. कोकणा व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रातील आंबा पिकासाठी विमा अर्जाची अंतिम मुदत ही ३१ डिसेंबर २०२४ ही आहे. तर डाळिंब पिकासाठी विमा अर्जाची अंतिम मुदत ही १४ जानेवारी २०२५ असून याव्यतिरिक्त फळ पिकांसाठी विमा भरण्याची मुदत संपलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना अजूनही आपल्या फळ पिकाचा विमा उतरवता येणार आहे अशा शेतकऱ्यांना फळपीक विमा भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आत्तापर्यंत किती आले अर्ज?
केळी पिकामध्ये ८२,०५८ अर्जदार यांनी भाग घेतला असून मागच्या वर्षी ही संख्या ६२ हजार ५५९ एवढी होती. यंदा २० हजार जास्त अर्ज प्राप्त झाल्यामुळे कृषी आयुक्तालयाकडून क्षेत्रीय पडताळणी सुरू आहे. द्राक्ष पिकासाठी ९ हजार १५९ अर्ज प्राप्त झाले असून मागच्या वर्षी ४ हजार ५२२ अर्ज प्राप्त झाले होते. तर स्ट्रॉबेरी पिकासाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. मोसंबी पिकामध्ये मात्र अर्ज करण्याची संख्या कमालीची कमी झाली आहे. मागच्या वर्षी १५ हजार ९७० विमा अर्ज आले होते. तर यावर्षी केवळ ८ हजार २०० विमा अर्ज कृषी आयुक्तालयाकडे प्राप्त झाले आहेत. पाण्याच्या कमतरतेमुळे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी बाग काढल्यामुळे हे अर्ज कमी आल्याचे दिसते.
शेतकऱ्यांनो हे लक्षात ठेवा
१. गतवर्षी मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड केली नसताना
२. फळबाग उत्पादनक्षम वयाची नसताना
३. कमी क्षेत्रावर फळबाग लागवड असताना जास्त क्षेत्रावर विमा घेणे
४. इतर शेतकऱ्याच्या शेतावर विमा घेणे
यांसारखे प्रकार निदर्शनास आल्याने त्यांचे विमा प्रस्ताव रद्द करण्यात आले असून त्यांचा विमा हप्ता जप्त करण्यात आले आहेत. तर अशा शेतकऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते यामुळे शेतकऱ्यांना अशा पद्धतीने पीक विमा उतरवू नये.