Pune : राज्यातील मागील खरीप आणि चालू असलेल्या रब्बी हंगामाच्या पीक विमा अर्जामध्ये मोठा घोटाळा समोर आला आहे. कृषी विभागाच्या फेर तपासणीमध्ये बोगस पीक विमा अर्जाची ही पोलखोल झाली असून यामध्ये फळपीक विमा योजना आणि खरीप व रब्बी हंगामातील फळपीक विमा योजनेतील अर्जांचा सामावेश आहे. आत्तापर्यंत राज्यातील सव्वा पाच लाख पीक विमा अर्ज बोगस आढळले आहे.
दरम्यान, मागच्या वर्षातील मृग बहारासाठी लागू केलेल्या फळपीक विमा अर्जामध्ये, लागवड क्षेत्रामध्ये आणि प्रत्यक्ष ई-पीक पाहणीमध्ये कृषी विभागाला मोठी तफावत आढळली होती. त्यामुळेच कृषी विभागातील संचालक विनयकुमार आवटे यांनी विभागीय स्तरावर फेर तपासणीचे आदेश दिले होते. क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी तर यामध्ये त्यांना बोगस विमा अर्ज आढळून आले असून या अर्जांची संख्या १४ हजारांपेक्षा जास्त होती.
यासोबतच खरीप २०२४ मध्ये एकूण १ कोटी ६८ लाख विमा अर्ज आले होते त्यातील अपात्र अर्जांची संख्या ही ४ लाख ४६ हजार एवढी असून रब्बी २०२४-२५ या हंगामासाठी एकूण ५५ लाख पीक विमा अर्ज आले होते. त्यातील ७३ हजार २१७ अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले आहेत.
यासोबतच विमा कंपनीने परत केलेल्या अर्जाची संख्या ही खरीप २०२४ या हंगामात ४६२ तर रब्बी २०२४-२५ या हंगामात तब्बल ३९ हजार ९१२ एवढी आहे. यामुळे दोन्ही हंगामात बोगस पीक विमा अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही खूप मोठी आहे.
विमा अर्ज अपात्र ठरण्याची कारणे
- शेतात पीक नसताना विमा भरणे
- दुसऱ्याच्या शेतातील पिकाचा विमा आपल्या नावे भरणे
- प्रत्यक्ष पिकाचे क्षेत्र कमी पण विमा जास्त क्षेत्राचा भरणे
- पीक एक विमा दुसऱ्याच पिकाचा
- ई-पीक पाहणी न करणे
- बोगस जमीनीवर विमा अर्ज करणे