Pune : राज्यात मृग बहार २०२४ हंगामातील फळपीक विमा अर्जामध्ये मोठा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. कृषी आयुक्तालयाच्या पुढाकारामुळे बोगस अर्ज अपात्र करण्यात आले असून शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचे काम चालू आहे. कृषी विभागाच्या या कामामुळे शासनाचे हजारो कोटी रूपये वाचले आहेत.
दरम्यान,फळपीक विमा योजनेसाठी या हंगामात ७३ हजार ७८७ अर्ज आले होते. त्यातील अनेक ठिकाणी बागा नसल्याचा संशय आल्यानंतर कृषी विभागाने फेरपडताळणी केली आणि राज्यभरातील ५५ हजार १८३ अर्ज तपासले असता त्यातील १९ टक्के म्हणजेच १० हजार ४७६ ठिकाणी फळपीक आढळलेच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
त्याबरोबरच लागवड क्षेत्रापेक्षा जास्त विमा संरक्षित क्षेत्र असलेल्या अर्जाची संख्या ही ३ हजार ८७७, एकाच क्षेत्रावर दोन किंवा अधिक वेळा विमा घेणाऱ्या अर्जाची संख्या ५, उत्पादनक्षम नसलेल्या बागांचा विमा उतरवलेल्या अर्जाची संख्या १४५ असे एकूण १४ हजार ५०३ बोगस अर्ज मिळाले असून तपासणी केलेल्या अर्जांच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल २६ टक्के एवढे आहे.
सर्वांत जास्त बोगस अर्जाचे प्रमाण हे ठाणे जिल्ह्यात असून येथे ९४ टक्के अर्ज अपात्र करण्यात आले आहेत. या जिल्ह्यात केवळ ७१ अर्ज आले होते त्यापैकी ६७ अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. त्याबरोबरच सातारा जिल्ह्यातील ४६ टक्के, सांगली जिल्ह्यातील ३३ टक्के, पुणे जिल्ह्यातील ३८ टक्के, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३० टक्के आणि जालना जिल्ह्यातील ३९ टक्के अर्ज अपात्र करण्यात आले आहेत.
सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अर्जाची फेरतपासणी सुरू असल्यामुळे तेथील अहवाल लवकरच उपलब्ध होणार आहे. राज्यात मृग २०२४ हंगामातील तपासणी केलेल्यापैकी १४ हजार अर्ज अपात्र करण्यात आलेत. शेतकऱ्यांनी बोगस फळपीक विमा उतरवू नये. असे आढळून आल्यास शेतकऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
- विनयकुमार आवटे (कृषी संचालक)