Join us

धक्कादायक! मागच्या खरिपातील पीक नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपन्यांकडे अजूनही 'थकीत'

By दत्ता लवांडे | Published: June 13, 2024 4:03 PM

मागच्या हंगामात राज्यात दुष्काळी परिस्थीती असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते.

पुणे :  मागच्या हंगामात राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. तर अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना या पिकांच्या नुकसानीचे वेळेत पैसे मिळाले नाहीत. तर २०२३-२४ च्या खरिप हंगामातील पिकांची नुकसान भरपाई अजूनही पिक विमा कंपन्यांकडे थकीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

दरम्यान, दोन पावसामधील खंड आणि मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीच्या ट्रीगरनुसार शेतकऱ्यांना पिकविम्याची अग्रीम रक्कम देणे सक्तीचे होते पण विमा कंपन्यांनी तसे केले नाही. शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी अग्रीमची रक्कम मिळण्याचे आश्वासन सरकारने दिले होते पण विमा कंपन्यांनी कोणत्या ना कोणत्या कारणांवरून विमा रक्कम देण्यास विलंब केला. 

राज्य सरकारने यंदा १ रूपयांत पीक विमा ही योजना राबवली होती. त्यामुळे विमा हप्त्याची रक्कम राज्य सरकारकडून या कंपन्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. पण अजूनही राज्यातील ९ विमा कंपन्यांकडे नुकसान भरपाईची रक्कम थकीत आहे. निश्चित नुकसान भरपाईनुसार विमा कंपन्यांनी ४ हजार ३०१ कोटी रूपयांची रक्कम शेतकऱ्यांना देणे अपेक्षित होते पण अद्याप या कंपन्यांकडून ३ हजार ५१५ कोटी रूपयांचीच रक्कम शेतकऱ्यांना वर्ग करण्यात आली आहे. तर ७८५ कोटी रूपयांची रक्कम अजूनही या कंपन्यांकडे थकीत आहे. 

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ मधील एकूण निश्चित, वितरीत व प्रलंबित नुकसान भरपाईचा तपशील

  • राज्यातील एकूण विमा कंपन्या - ९
  • एकूण विमा हप्ता रक्कम - ८ हजार १५ कोटी रूपये
  • निश्चित नुकसान भरपाई - ४ हजार ३०१ कोटी रूपये
  • वितरीत नुकसान भरपाई - ३ हजार ५१५ कोटी रूपये
  • प्रलंबित नुकसान भरपाई - ७८५.६० कोटी रूपये
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपीक विमा