विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांस आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना सन २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे. सन २०२३-२४ मध्ये राज्यात ही पीक विमा योजना बीड पॅटर्न (८०:११०) आधारित राबविली जाणार आहे. यात विमा कंपनीवर नुकसान भरपाईचे जास्तीच जास्त दायित्व एकूण विमा हप्त्याच्या ११०% पर्यंत असणार, यापेक्षा जास्त असणारी नुकसान भरपाई राज्य शासन देईल. तर नुकसान भरपाई एकूण विमा हप्त्याच्या ८०% पेक्षा कमी आल्यास.
विमा कंपनी एकूण विमा हप्त्याच्या २०% रक्कम स्वतकडे नफा म्हणून ठेऊन उर्वरित शिल्लक रक्कम राज्य शासणार परत करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून सन २०१६-१७ पासून ते २०२२-२३ पर्यंत साधारण रुपये २२,६२९ कोटीची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. अशी हि योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वपूर्ण आहे.
या योजनेत खरीप हंगाम २०२३ मधील पिके: भात (धान), खरीप ज्वारी , बाजरी, नाचणी (रागी), मका, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, तीळ, सूर्यफुल, कारळे, कापूस व कांदा या १५ अधिसूचित पिकांसाठी,अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल.
योजनेत कोणत्या शेतकऱ्यांस सहभागी होता येईलअधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कूळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टल वर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे.
योजनेत सहभागासाठी अंतीम मुदत: दि. ३१ जुलै २०२३ आहे.जोखीमस्तर: सर्व पिकांसाठी ७० % आहे.उंबरठा उत्पादन: अधिसूचित क्षेत्रातील, अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील ७ वर्षातील सर्वाधिक उत्पादनाची ५ वर्षाचे सरासरी उत्पादन गुणीले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाते .
विमा संरक्षणाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत
- पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट.
- पिक पेरणीपूर्व/लावणीपूर्व नुकसान: यात अपुरा पाऊस, हवामानातील इतर प्रतिकूल घटकामुळे अधिसूचित मुख्य पिकाची त्या भागातील सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५% पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी/लावणी होऊ शकली नाही तर विमा संरक्षण देय आहे.
- हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनात उंबरठा उत्पादनाच्या ५०% हून अधिक घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय आहे.
- काढणी पश्चात चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी/काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाते.
- स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यास अधिसूचित पिकाचे नुकसान हे वैयक्तिक पंचनामे करून निश्चित करण्यात येते. (युद्ध आणि अणू युद्धाचे दुष्परिणाम, हेतू पुरस्सर केलेल्या नुकसानीस व इतर टाळता येण्याजोग्या धोक्यास विमा संरक्षण मिळत नाही)
ई-पीक पाहणी:शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणी मध्ये करावी. विमा योजनेत विमा घेतलेल्या पिकात आणि ई-पीक पाहणी मध्ये नोंदवलेल्या पिकात काही तफावत आढळल्यास ई-पीक पाहणी मध्ये नोंदवलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल.
योजना राबविणारी विमा कंपनी व संबंधित जिल्हे
अ.क्र. | विमा कंपनीचे नाव व टोल फ्रि क्रमांक | जिल्हे |
---|---|---|
१ | भारतीय कृषी विमा कंपनी १८०० ४१९ ५००४ (५ जिल्हे) | वाशीम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, बीड |
२ | ओरिएटल इन्शुरेंस कंपनी लि. १८०० ११ ८४८५ (६ जिल्हा) | अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा |
३ | आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरेंस कंपनी लि. १८०० १०३ ७७१२ (३ जिल्हे) | परभणी, वर्धा, नागपुर |
४ | यूनायटेड इंडिया जनरल इन्शुरेंस कंपनी लि. १८०० २३३ ७४१४ (४ जिल्हे) | नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, |
५ | एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरेंस कंपनी लि. १८०० २६६ ०७०० (५ जिल्हे) | हिंगोली,अकोला, धुळे, पुणे, उस्मानाबाद |
६ | युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरेंस कंपनी लि. १८०० २०० ५१४२ (३ जिल्हे) | जालना, गोंदिया, कोल्हापूर |
७ | चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरेंस कंपनी लि. १८०० २०८ ९२०० (४ जिल्हे) | औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड |
८ | रिलायंइन्स जनरल इन्शुरेंस कंपनी लि. १८०० १०२ ४०८८ (३ जिल्हे) | यवतमाळ, अमरावती, गडचिरोली |
९ | एस बी आय जनरल इन्शुरेंस कंपनी लि. १८०० २०९ ११११ (१ जिल्हे) | लातूर |
शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता हा सर्व पिकांसाठी प्रती अर्ज एक रुपया असणार आहे.
खरीप हंगामातील सर्वसाधारण पिक निहाय विमा संरक्षित रक्कम पुढील प्रमाणे आहे यात जिल्हानिहाय फरक संभवतो.
अ.क्र. | पिक | सर्वसाधारण विमा संरक्षित रक्कम रु./हे |
१ | भात | ४०००० ते ५१७६० |
२ | ज्वारी | २०००० ते ३२५०० |
३ | बाजरी | १८००० ते ३३९१३ |
४ | नाचणी | १३७५० ते २०००० |
५ | मका | ६००० ते ३५५९८ |
६ | तूर | २५००० ते ३६८०२ |
७ | मुग | २०००० ते २५८१७ |
८ | उडीद | २०००० ते २६०२५ |
९ | भुईमुग | २९००० ते ४२९७१ |
१० | सोयाबीन | ३१२५० ते ५७२६७ |
११ | तीळ | २२००० ते २५००० |
१२ | कारळे | १३७५० |
१३ | कापूस | २३००० ते ५९९८३ |
१४ | कांदा | ४६००० ते ८१४२२ |
विमा नुकसान भरपाई कशी निश्चित करतातस्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या बाबी अंतर्गत पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत याबाबत नुकसानीची सूचना संबंधित शेतकऱ्याने संबंधित विमा कंपनीस कळविणे बंधनकारक आहे. हि सूचनाकेंद्र शासन पीक विमा APP (crop insurance App), संबंधित विमा कंपनी टोल फ्रि क्रमांक, विमा कंपनीचे तालुका/जिल्हास्तरीय कार्यालय, संबंधित बँक, कृषी/महसूल विभाग याद्वारे देण्यात यावी. यात नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई रक्कम निश्चित केली जाते.
खरीप २०२३ च्या हंगामात उत्पादन आधारित नुकसान भरपाई निश्चित करताना महसूल मंडल/तालुक्यात पिक कापणी प्रयोगाद्वारे आलेले सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यांस खालील सुत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम काढली जाते. सरासरी उत्पादन काढताना कापूस, सोयाबीन, भात या निवडक पिकाचे बाबतीत रीमोट सेन्सिंग तंत्रज्ञान द्वारे प्राप्त उत्पादनास ३0% आणि पीक कापणी द्वारे प्राप्त उत्पादनास ७०% भारांकन देऊन पिकाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे. उर्वरित पिकांचे बाबतीत पिक कापणी द्वारे प्राप्त उत्पादन गृहीत धरले जाणार आहे.
उंबरठा उत्पादन - प्रत्यक्ष आलेले सरासरी उत्पादन
नुकसान भरपाई रु. = ------------------ ----------------- -X विमा संरक्षित रक्कम रू.
उंबरठा उत्पादन
नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याने काय करावेनैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे आकस्मात नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत याबाबत केंद्र शासन पीक विमा APP (crop insurance App), संबंधित विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी/महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक याद्वारे कळवावे. यात नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई रक्कम निश्चित केली जाते. संपूर्ण हंगामात विविध कारणांमुळे अधिसूचित क्षेत्रातील पिकाच्या सरासरी उत्पादनात उंबरठा उत्पादनापेक्षा घट आल्यास वरील सूत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम अंतीम केली जाते व सदर अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांकरिता विमा योजनेत भाग घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्याप्रमाणे नुकसान भरपाई त्यांचे बँक खात्यात जमा केली जाते. विमा योजने अंतर्गत सर्व प्रकारची नुकसान भरपाई रक्कम हि संबंधित शेतकऱ्याचे बँक खात्यावर जमा करण्यात येते. त्यामुळे बँक खाते योग्य नोंदवण्याची खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यावी.
विमा योजनेत सहभागी होण्याकरिताशेतकऱ्याने काय करावे ?अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांस देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्या साठी शेतकर्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला ७/१२ चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व पिक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेवून प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देवून व हप्ता भरुन सहभाग घ्यावा. हप्ता भरलेली पोहोच पावती त्याने जपून ठेवावी. या शिवाय कॉमन सर्विस सेंटर (CSC) आपले सरकार च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता.
महत्वाच्या नवीन बाबी
- या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे त्याचाच विमा घ्यावा. शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागेल. शेतातील पीक आणि विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास ई पीक पाहणी मधील नोंद अंतिम धरण्यात येईल म्हणून सर्व शेतकर्यांनी आपल्या पिकाची नोंद ई पीक पाहणी मध्ये वेळीच करावी.
- या वर्षी भात, कापूस, सोयाबीन पिकांमध्ये महसूल मंडल मधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रीमोट सेसिंग तंत्रज्ञान चा वापर करून येणार्या उत्पादनास ३०% भारांकन आणि पीक कापणी प्रयोगद्वारे आलेल्या उत्पादनास ७०% भारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे.
- भाडे करारद्वारे पिक विमा योजनेत सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडे करार प्रत पिक विमा पोर्टल वर उपलोड करावी लागेल.
- पिक विमा योजनेत सहभागी होण्यापूर्वी मयत असलेल्या शेतकऱ्याच्या नावे अथवा त्याचे नावे असलेल्या जमिनीवर विमा योजनेत भाग घेतल्याचे निदर्शनास असल्यास विमा अर्ज अपात्र होईल.
योजनेच्या अधिक माहितीसाठी कोठे संपर्क साधावा: संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.
- विनयकुमार आवटे(कृषी सहसंचालक, विस्तार व प्रशिक्षण-१, कृषि आयुक्तालय, पुणे-१)