Join us

मुदत संपली; पावणे तीन लाख शेतकरी विमाधारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2023 10:00 AM

सातारा जिल्ह्यातील माण तालुका अग्रेसर असून ७५ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान, प्रथमच पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो.

राज्य शासनाने यंदाच्या खरीप हंगामापासून एक रुपयात पीक विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुदतीत जिल्ह्यातील तब्बल पावणे तीन लाख शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे. यामध्ये माण तालुका अग्रेसर असून ७५ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान, प्रथमच पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो.

यासाठी विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ आदी कारणाने पिकांचे नुकसान झाल्यास विमा उतरविलेल्या पिकांसाठी भरपाई देण्यात येते. यासाठी पूर्वी शेतकऱ्यांना ठरावीक रक्कम भरावी लागत होती. तर राज्य आणि केंद्र शासनाचाही वाटा असायचा; पण राज्य शासनाने चंदाच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला. त्याची सध्या अंमलबजावणीही झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही एक रुपया भरून पिकाचा विमा उतरवता आला. यासाठी एकूण नऊपिकांचा समावेश होता. भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद आणि कांदा या पिकांसाठी विमा उतरविण्यात आला. त्यातच या पीकविमा भरण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत होती; पण नंतर ३ ऑगस्टपर्यंत मुदत वाढविण्यात आली. एक रुपया भरूनच शेतकऱ्यांना विमा उतरवावा लागत होता. त्यामुळे विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत दोन लाख ७५ हजार ६६८ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. आतापर्यंतचा हा उच्चांक आहे.

कोणत्या पिकासाठी किती विमा मिळणार (हेक्टरी रुपयात)पीक आणि कंसात भरपाई रक्कमभात (४१ हजार)ज्वारी (२० हजार)बाजरी (१८ हजार)नाचणी (२० हजार)भुईमूग (४० हजार)सोयाबीन (३२ हजार)मूग (२५,८२७ रुपये)उडीद (२६ हजार)

गतवर्षी ४,७०५ शेतकरी विमाधारक- आतापर्यंत पीक विमा योजना ही शेतकऱ्यांचा वाटा आणि राज्य व केंद्र शासनाच्या हिश्यातून राबविली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा उतरवताना जादा रक्कम मोजावी लागत होती.- गेल्यावर्षी खरीप हंगामात चार हजार ७०५ शेतकरी योजनेत सहभागी झाले होते. यावर्षीपासून शासनाने एक रुपयात विमा देऊ केला आहे. त्यामुळे वरील सर्व रक्कम शासन भरणार आहे. यामुळे सहभागी शेतकऱ्यांची संख्या यदा अनेक पटीने वाढलेली आहे.सातारा जिल्ह्यातील पीक विमा उतरवलेले शेतकरी तालुकानिहायतालुका आणि कंसात शेतकरीजावळी (९,५२४)कराड (२०,५४६)खंडाळा (१८,४४७)खटाव (६३, ४२८)महाबळेश्वर (२,४४)८माण (७५,५५१)पाटण (२७,८४८)फलटण (२४,६१३)सातारा (१८,४२२)वाई (२२,७६४)

'राज्य शासनाने खरीप हंगामापासून एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे. या अंतर्गत अपुरा पाऊस, पावसाचा खंड अतिवृष्टी आदी कारणांनी पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळू शकते, पीक विमा उतरविण्यासाठी ३ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली. त्यातच यंदा सहभागी शेतकऱ्यांची संख्या पावणे तीन लाखापर्यंत गेली आहे.- विजय माईनकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी'

'राज्य शासनाने खरीप हंगामासाठी एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली. या योजनेसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दि. ३ ऑगस्ट या अंतिम मुदतीपर्यंत पावणे तीन लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीकविमा नोंदणी केलेली आहे. जागृतता वाढल्यानेच शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेत सहभाग वाढला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.- भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी' 

टॅग्स :पीक विमापीकपीक व्यवस्थापनपाऊसशेतीशेतकरीसरकार