पुणे : राज्यातील एकूण क्षेत्रापैकी अर्ध्या क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. अद्यापही काही भागांत मान्सूनचा पाऊस पुरेसा न बरसल्याने पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. पण ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज भरले आहेत. तर या वर्षीसुद्धा सरकारने एक रूपयांत पीक विमा योजना लागू केली आहे. विमा हफ्ता सरकार भरणार असल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत आहे.
दरम्यान, यंदा अद्यापही ५० टक्के क्षेत्रावरील पेरण्या बाकी असल्यामुळे कृषी विभागाच्या माहितीनुसार आत्तापर्यंत म्हणजेच २७ जून पर्यंत २४ लाख ३६ हजार ३९९ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला आहे. २६ जून अखेर राज्यातील १९ लाख ७८ हजार ७३८ शेतकऱ्यांनी अर्ज केला होता. तर गेल्या २४ तासांत ४ लाख ५७ हजार ६६१ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला आहे.
मागच्या वर्षी १ रूपयांत पीक विमा या योजनेचा १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता. तर यंदाही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. १५ जुलै ही पीक विम्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पीक विमा अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे
- लाभार्थ्याचे आधार कार्ड
- सातबारा
- बँक पासबुक
- पीक पेरा स्वयंघोषणापत्र