पुणे : मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्यांनी पेरण्या आणि लागवडी सुरू केलेल्या आहेत. राज्यातील जवळपास ५ ते ६ टक्के पेरण्या झाल्या असून बहुतांश भागात पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी अद्याप पेरण्या केल्या नाही. तर ७५ ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. तर आत्तापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीकविमा अर्ज भरला आहे.
दरम्यान, सरकारने याही हंगामात एक रूपयात पीक विमा ही योजना लागू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ अर्ज भरण्यासाठी खर्च करावा लागणार आहे. त्याचबरोबर खरिपातील १४ पिकांसाठी ही योजना लागू केली आहे. तर मृग बहारातील आणि आंबिया बहरातील फळपिकांनासुद्धा पीकविमा योजना मंजूर करण्यात आली आहे.
या खरिपातील पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी सरसावले असून एकाच दिवसांत तब्बल २ लाख ४७ हजार ८०२ शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केला आहे. तर महाराष्ट्र राज्यात आत्तापर्यंत एकूण ४ लाख १८ हजार ३५० शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केला आहे. अद्याप बहुतांश ठिकाणी पेरण्या आणि लागवडी पूर्ण झाल्या नसल्यामुळे पीकविमा अर्ज आले नसल्याची माहिती आहे.
मागच्या वर्षी खरीप हंगामात १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. यंदा पीकविमा भरण्यासाठी १५ जुलै ही अंतिम तारीख असून तोपर्यंत पेरण्या आवरून शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे.