रऊफ शेख
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसोबत पीकविमा कंपनीने थट्टा केली असल्याचे दिसून आले आहे. सुमारे शंभरपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्यापोटी प्रत्येकी १ हजार रुपये जमा झाले आहेत. यामुळे शेतकरी वर्गातून नाराजीची सूर उमटत आहे.
फुलंब्री तालुक्यात शेतकऱ्यांनी २०२३ साली खरीप पिकाचा प्रधानमंत्री पिकविमा योजनेंतर्गत चोलामंडळ पीकविमा या कंपनीकडे ६३ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला होता. त्यानंतर खरीप हंगाम २०२३ मध्ये शेतकऱ्यांनी या पीकविमा कंपनीकडे शेतातील पिकांचे नुकसान झालेले असल्याच्या तक्रारी केल्या होत्या.
या तक्रारीवरून संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींनी येऊन पाहणी केली व रिपोर्ट कंपनीला सादर केला. मात्र, यातील २६ हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी विविध कारणांमुळे विमा कंपनीने फेटाळल्या आहेत. तर केवळ ३६ हजार शेतकऱ्यांच्याच तक्रारी ग्राह्य धरण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत केवळ १० हजार ५५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम पाठविण्यात आली आहे, तर २६ हजार ५४ शेतकऱ्यांना अजूनही या रकमेची प्रतीक्षा आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांना रक्कम मिळालेली आहे, ती अत्यंत कमी असून, शंभर शेतकऱ्यांच्या खात्यांवर तर प्रत्येकी १ हजार रुपयेच जमा झाले आहेत. यामुळे कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचे समोर आले आहे.
विमा कंपनीकडून १ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकाचा विका काढला होता. विमा कंपनीकडून माझ्या खात्यात केवळ ४५५६ रुपये जमा झाले आहेत. मी भरलेले पैसे व शासनाकडून कंपनीला ९०७६ रुपये देण्यात आले; पण त्याची निम्मी रक्कमच मिळाली. - सतीश वाघ, शेतकरी, फुलंब्री.
१०८ शेतकऱ्यांच्या खात्यांवर १ हजार रुपये विमा कंपनीकडून पाठविण्यात आले आहेत. नुकसानीच्या पंचनाम्याच्या आधारावर ती रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली आहे. - भारत कासार, तालुका कृषी अधिकारी, फुलंब्री.
हेही वाचा - आत्महत्या करायला निघालेला मराठवाड्यातील तरुण; आज आहे चार चाकीत फिरणारा प्रगतीशील शेतकरी