Join us

Crop Insurance : पीक विमा अर्ज भरण्यासाठी हा जिल्हा अव्वल! राज्याच्या तुलनेत १२ टक्के सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 9:38 PM

Crop Insurance Top District : राज्यातील बहुतांश भागातील पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकरी विमा अर्ज भरण्यासाठी घाई करत आहेत. तर १५ जुलै ही विमा अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख आहे.

Crop Insurance Application Top Disctrict : राज्य  सरकारने यंदाही एक रूपयांत पीक विमा योजना लागू केली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर आत्तापर्यंत ९७ लाख २९ हजार शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज भरल्याची माहिती कृषी विभागाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. तर अजून ६० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज भरणे बाकी आहे.

दरम्यान, राज्यातील छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वांत जास्त शेतकऱ्यांनी पिकविम्यासाठी अर्ज केला आहे. तर जिल्हानिहाय विचार केला तर सर्वांत जास्त पिकविम्यासाठी अर्ज हे बीड जिल्ह्यातून आले आहेत. एकूण अर्जाच्या तुलनेत १२ टक्के अर्ज हे बीड जिल्ह्यातून आले असून येथील १२ लाख ११ हजार २२१ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले आहेत. येथील पीक विमा संरक्षित क्षेत्र हे ५ लाख १९ हजार हेक्टर असून विमा संरक्षित रक्कम २ हजार ६७४ कोटी रूपयांची आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात राज्यातील सर्वांत जास्त म्हणजे २७ टक्के शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे. या विभागात २६ लाख ६० हजार ७४९ शेतकऱ्यांनी पिकविम्यासाठी अर्ज केला आहे. या विभागातील पीक विमा संरक्षित क्षेत्र हे १२ लाख ५२ हजार हेक्टर असून विमा संरक्षित रक्कम ६ हजार २८८ कोटी रूपयांची आहे.

कोणत्या विभागात किती शेतकऱ्यांनी केला अर्ज

  • कोकण विभाग - ६२ हजार ९२१ 
  • नाशिक विभाग - ६ लाख २३ हजार ८९२
  • पुणे विभाग - १२ लाख ३ हजार ३२३
  • कोल्हापूर विभाग - २ लाख ६५ हजार ९७९
  • छत्रपती संभाजीनगर  विभाग - २६ लाख ६० हजार ७४९
  • लातूर विभाग - २६ लाख ६१ हजार ७९१
  • अमरावती विभाग - १६ लाख ५७ हजार ५२४
  • नागपूर विभाग -  ५ लाख ९३ हजार ४७५
  • एकूण अर्ज - ९७ लाख २९ हजार ६५४
टॅग्स :पीक विमापीकशेतकरीलागवड, मशागत