शिरीष शिंदे
२०२३ मध्ये १८ लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. तर १ जुलै ते १ ऑगस्ट २०२४ या कालावधीत १७ लाख १४ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत पीक विमा भरणाऱ्यांची संख्या १ लाख २८ हजारांनी घटली आहे. मागच्या खरीप हंगामात लोकमतने बोगस पीक विमा प्रकरण उजेडात आणल्याने बोगस पद्धतीने पीक विमा भरणाऱ्यांची संख्या घटली आहे.
बीड जिल्ह्यात यंदा जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. सर्व ठिकाणी चांगला पाऊस झाल्यामुळे वेळेवर पीकपेरा झाला होता. त्यानुसार पीक विमा भरण्यास लवकरच सुरुवात झाली होती. चांगला पाऊस झाल्याने विमा भरणाऱ्यांची संख्या वाढेल असा अंदाज होता, परंतु तो अंदाज फोल ठरला. उलट मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीक विमा भरणाऱ्यांची संख्या घटली आहे.
दरम्यान, २०२३ च्या खरीप हंगामात काही लोकांनी एमआयडीसी, नगर परिषदेची जागा यासह इतर शासकीय ठिकाणी असलेल्या जागा या शेतजमिनी दाखवून बनावट पद्धतीने पीक विमा भरला होता. हा प्रकार लोकमतने समोर आणला होता.
याप्रकरणी आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून वडवणी व गेवराई तालुक्यात बोगस पद्धतीने पीक विमा भरणारे सीएससी चालक व बनावट शेतकऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी कृषी विभागाने पत्र दिले आहे. त्यामुळे चालू खरीप हंगामात बोगस पीक विमा भरणाऱ्या लोकांची संख्या घटली आहे. लोकमतमुळे बोगस पीक विमा भरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
...अशी आहे पीक विमा भरणाऱ्यांची आकडेवारी
शेतकरी संख्या | क्षेत्र | |
---|---|---|
अंबाजोगाई | १०३२०२ | ७६१८४ |
आष्टी | २२९९९७ | ८१४९९ |
बीड | २४५४४० | ९७२४५ |
धारूर | ८२६६६ | ४१०९९ |
गेवराई | २९६५९९ | १०२९४४ |
केज | २२२०७३ | ११००४६ |
माजलगाव | १०२००६ | ७३६४८ |
परळी | १११३०७ | ५०००२ |
पाटोदा | १३२९७१ | १३२९७१ |
शिरूर | १३२९७१ | ३९८२५ |
वडवणी | ५४६०९ | ३९८२५ |
एकूण | १७१४४३१ | ७७५६६२ |
१९,१८६ हेक्टरचा पीकविमा भरला नाही
बीड जिल्ह्यात यंदा खरीप हंगामाचे क्षेत्र ७ लाख ८५ हजार ७८६ पेरणी क्षेत्र आहे. त्यापैकी ७ लाख ७४ हजार ८४८ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. म्हणजेच जिल्ह्यात ९८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला ७ लाख ७५ हजार ६६२ एवढ्या क्षेत्रावर पीक विमा काढला गेला आहे. एकूण पेरण्या पैकी १९ हजार १८६ हेक्टरचा पीक विमा भरला गेला नाही.
सर्वाधिक शेतकरी गेवराई तालुक्यातून सहभागी
जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी विमा भरून पिके संरक्षित केली आहेत. १७ लाख १४ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असून सर्वाधिक पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या गेवराई तालुक्यात आहे. गेवराई तालुक्यातील २ लाख ९६ हजार ५९९ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. पाठोपाठ बीड तालुक्यातील २ लाख ४५ हजार ४४० शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. केज व आष्टी तालुक्यातही पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २ लाखावर आहे.