Join us

Crop Insurance १ लाख ५ हजार शेतकऱ्यांचे पीक विम्याचे ६२ कोटी कधी देणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 9:33 AM

१८ जूनचे अल्टीमेटम अन्यथा शेतकरी बांधवांचा आंदोलनाचा इशारा

बीड जिल्ह्यातील १ लाख ५ हजार शेतकऱ्यांना मागील वर्षीचा पीक विमा खरीप हंगाम सुरू होऊनही मिळाला नसल्याने शेतकरी जाब विचारत असून, १८ जूनपर्यंत पीक विमा रकमेचे वाटप न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह आंदोलनाचा इशारा धनंजय गुंदेकर यांनी दिला.

अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया या पीक विमा कंपनीकडे २०२३-२४ वर्षीचा खरीप पीक विमा हा बीड जिल्ह्याचा होता. या कंपनीने बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा अग्रिम पीक विमा दिला, मात्र यावर्षीचा उर्वरित पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना अद्याप दिलेला नाही.

ज्या- ज्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीत पिकाचे नुकसान झाले, म्हणून कंपनीकडे रितसर ऑनलाइन तक्रार केली. त्या-त्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनी नुकसानीची रक्कम देईल, असे सांगण्यात येत होते, मात्र यावर्षीच्या खरीप पिकांची लागवड करण्याची वेळ आलेली असतानादेखील पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली नाही.

पीक विमा कंपनीकडून १ लाख ५ हजार शेतकऱ्यांच्या नुकसान तक्रारी ग्राह्य धरत त्यांना जवळपास ६२ कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. मात्र, संपूर्ण राज्यात पिक विम्याच्या नुकसान भरपाईचे वाटप होत असताना, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप हे वाटप होताना दिसत नाही.

किमान हक्काचा पीक विमा, तरी शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशी अपेक्षा धनंजय गुंदेकर यांनी व्यक्त केली आहे. येत्या १८ जूनपर्यंत पीक विमा रकमेचे वाटप केले नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दुर्लक्ष कशामुळे ?

शेतकऱ्यांना आधीच मागील दोन्ही हंगामांत दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. ३ तालुके वगळता अख्ख्या जिल्ह्यात दुष्काळ असूनही फुटका रुपया मदतीचा मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बीड जिल्ह्यात कुणीही बोलायलादेखील तयार नाही, अशी शेतकऱ्यांची भावना आहे.

हेही वाचा - Dairy Success Story १५ म्हशींच्या संगोपनातून राहुल पाटील मिळवितात महिन्याला दीड लाखाचे उत्पन्न

टॅग्स :पीक विमाशेतकरीशेतीपीकशेती क्षेत्रबीडपीक कर्ज