Crop Insurance Latest Updates : मागच्या काही दिवसांपासून राज्यात मान्सूनच्या पावसाचा (Monsoon Rain) जोर कमी झाल्यामुळे पेरण्या खोळंबल्याचे चित्र आहे. तर पेरण्या झाल्या नसल्यामुळे शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा अर्ज करण्यासाठी अडथळे येत आहेत. शेतकरी जोरदार पावसाची वाट पाहत आहेत. तर ज्या भागांत पाण्याची उपलब्धता आहे अशा भागांतील शेतकऱ्यांनी पेरण्या आवरून घेतल्या आहेत. पण दुष्काळी भागातील पेरण्या (Sowing) अद्याप रखडलेल्या आहेत.
दरम्यान, मागच्या हंगामात राज्यातील १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेतला आहे. तर राज्य सरकारकडून याही वर्षी एक रूपयांत पीक विमा योजनेचा (PMFBY) लाभ शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. विमा हफ्याची रक्कम थेट केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीतून विमा कंपन्यांना जाणार आहे. पण यंदा राज्यात पेरण्या खोळंबल्या असून कृषी विभागाच्या अद्ययावत माहितीनुसार आत्तापर्यंत म्हणजे २८ जून पर्यंत केवळ २८ लाख ३१ हजार शेतकऱ्यांनीच पिक विम्यासाठी अर्ज केले आहेत.
छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वांत जास्त शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केले असून एकूण अर्जाच्या ३३ टक्के शेतकरी केवळ छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत. तर सर्वांत कमी पिकविमा अर्ज हे कोकण आणि कोल्हापूर विभागातून आले आहेत. कोकणातून केवळ ८ हजार तर कोल्हापुरातून केवळ ३५ हजार शेतकऱ्यांनी पिकविम्यासाठी अर्ज केला आहे.(Maharashtra farmer Crop Insurance Latest Updates)
विभागनिहाय शेतकरी अर्ज
- कोकण विभाग - ८ हजार ६९४
- नाशिक विभाग - १ लाख ७९ हजार
- पुणे विभाग - ३ लाख ६६ हजार
- कोल्हापूर विभाग - ३५ हजार १८४
- छत्रपती संभाजीनगर विभाग - ९ लाख ५९ हजार
- लातूर विभाग - ७ लाख ७८ हजार
- अमरावती विभाग - ४ लाख १० हजार
- नागपूर विभाग - ९७ हजार