Join us

Crop Loan Disbursement: खरीप हंगाम बैठक! पीक कर्ज वाटप येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्यासाठी विभागीय आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 1:36 PM

खरीप हंगामात नागपूर विभागातील शेतकऱ्यांना पीककर्ज Kharif Crop Loan वाटप लक्षांक जून महिन्याअखेर ७० टक्के आणि उर्वरित जूलै महिन्याअखेर पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी जिल्ह्यांना दिले.

नागपूर : खरीप हंगामात नागपूर विभागातील शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप लक्षांक जून महिन्याअखेर ७० टक्के आणि उर्वरित जूलै महिन्याअखेर पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी जिल्ह्यांना दिले.

ई-केवायसी व अन्य तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित असलेल्या पीक नुकसान भरपाई निधीचे तातडीने वाटप पूर्ण करा, दुष्काळ सदृष्य भागात शासनाने ठरवून दिलेल्या सवलती शेतकऱ्यांना प्राधान्याने देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. विभागात अनधिकृत कापूस बियाणे विक्री संदर्भात ९ गुन्हे दाखल करुन १६५.५३ लाखांचा ७९.३४ क्विंटल साठा जप्त करण्यात आल्याचे श्रीमती बिदरी यांनी सांगितले.

श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विभागाचा खरीप हंगाम आढावा घेण्यात आला, यावेळी त्यांनी या सूचना केल्या. विभागीय आयुक्तालयातील महसूल उपायुक्त दिपाली मोतीयेळे,विभागीय कृषी सहसंचालक शं.मा. तोटावार, यांच्यासह महावितरण, सिंचन विभाग, पाठबंधारे विभाग, कृषी व पणन मंडळ आदींचे अधिकारी उपस्थित होते. विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातून वरिष्ठ अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

चालू खरीप हंगामात आतापर्यंत ५ हजार २४७ कोटी ७ लाख ५८ हजार रुपयांच्या खरीप पीक कर्ज वाटपापैकी २ लाख १४ हजार ८९७ शेतकऱ्यांना १ हजार ८१९ कोटी ५२ लाख ११ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. उर्वरित लक्षांकापैकी जून महिन्याअखेर ७० टक्के आणि उर्वरित जूलै महिन्याअखेर पीक कर्ज वाटप पूर्ण करण्याचे निर्देश श्रीमती बिदरी यांनी दिले.

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीपोटी विभागातील ८५ हजार ६४४ शेतकऱ्यांना द्यावयाचा निधी ई-केवायसी, बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे  प्रलंबित आहे. महसूल व कृषी विभागाने शेतकऱ्यांचे ई-केवायसी, बँक खाते आधार लिंक करुन घेत पीक नुकसान भरपाई निधीचे तातडीने वाटप पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

अनधिकृत कापूस बियाणे विक्री संदर्भात ९ गुन्हे दाखल; १६५.५३ लाखांचा ७९.३४ क्विंटल साठा जप्तनागपूर विभागात खरीप हंगामातील अनधिकृत बियाणे, खते व किटकनाशकांबाबत कठोर कार्यवाही करण्यात आली. याअंतर्गत विभागात कापूस बियाणे विक्री संदर्भात एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यात १, वर्धा जिल्ह्यात १, चंद्रपूर जिल्ह्यात ६ व गडचिरोली जिल्ह्यात १ असे एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले असून १६५.५३ लाखांचा ७९.३४ क्विंटल साठा जप्त करण्यात आला आहे. रासायनिक खतासंबंधी नागपूर जिल्ह्यात एक गुन्हा दाखल झाला आहे. याअंतर्गत १.७५ मेट्रिक टनाचा ५२ लाखांचा साठा जप्त करण्यात आला. विभागात कायद्याच्या उल्लंघन प्रकरणी बियाण्यांचे २९ विक्रीबंद आदेश तर खतांचे ६ विक्रीबंद आदेश देण्यात आले आहेत.

बियाणे खरेदी व तक्रारी बाबत शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांकबियाणे खरेदी करतांना घ्यावयाच्या काळजी व तक्रारीबाबत नागपूर विभागातील सर्व कृषी केंद्रामध्ये टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० व मोबाईल तथा व्हाट्स ॲप क्रमांक ९३७३८२११७४ माहिती फलकाद्वारे प्रसिध्द करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

विभागात २०० गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकनागपूर विभागात २०० गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कार्यरत आहेत. खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार व उत्कृष्ट गुणवत्तेच्या कृषी निविष्ठा प्राप्त होण्याच्या दृष्टीने विभाग स्तरावर १, जिल्हास्तरावर ६, तालुका स्तरावर ६३ असे एकूण ७० भरारी पथक स्थापन करण्यात आले आहेत. बियाण्यांचे ६५८ आणि खतांचे ३६५ तसेच कीटकनाशकाचे ४२ नमुने काढण्यात आले असून गुणवत्ता तपासणीसाठी प्रयोगशाळेत सादर करण्यात आले.

दुष्काळ सदृष्य भागात शेतकऱ्यांना प्राधान्याने सवलतीविभागातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यातील १५ तालुके आणि ३४ मंडळामध्ये दुष्काळसदृष्य स्थिती असून शासनाने ठरवून दिलेल्या सवलती या भागात शेतकऱ्यांना प्राधान्याने देण्याच्या सूचनाही श्रीमती बिदरी यांनी  केल्या. या सवतली अंतर्गत जमीन महसूलात सूट देणे, सहकारी कर्जाचे पूर्नगठण करणे, शेतीची निगडीत कर्ज वसुलीस स्थगिती देणे, कृषी पंपाच्या चालू विज बिलात ३३.५ टक्के सूट देणे, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देणे आदी ८ सवलती प्राधान्याने देण्याच्या सूचना श्रीमती बिदरी यांनी दिल्या.

टॅग्स :पीक कर्जपीकसरकारखरीपनागपूरशेतकरीशेतीदुष्काळ