Join us

Crop Loan : हंगाम संपला तरी सावकाराचे उंबरठे शेतकरी झिजवतोय; प्रशासनाच्या निर्देशाला व्यापारी बँकांचा कोलदांडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 12:02 PM

शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज वाटपात अद्याप झाले नाही वाटपाचे घोडे अर्ध्या वाटेतच थांबले आहे. शेतकऱ्यांना रब्बीचे तरी पीक कर्ज वेळेत मिळणार का?(Crop Loan)

Crop Loan :हिंगोली : जिल्ह्यात गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही खरीप पीककर्ज वाटपाचे नियोजन फसले असून, हंगाम संपला तरी पीककर्ज वाटपाचे घोडे अर्ध्यावरच थांबले आहे. यात प्रामुख्याने व्यापारी बँकांची उदासीनता शेतकऱ्यांना भोवली आहे.जिल्ह्यात ३० सप्टेंबरअखेर केवळ ५५.३८ टक्केच पीककर्ज वाटप झाले असून, पीककर्ज वाटपाची परिस्थिती लक्षात घेता व्यापारी बँकांवर वचक कोणाचा? असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.

शेतकऱ्यांना खरीप पेरणीकरिता लागणारे बी-बियाणे खरेदीसाठी वेळेत पीककर्ज उपलब्ध होणे अपेक्षित आहे; परंतु जिल्ह्यात दरवर्षीच पीककर्ज वाटपाचे नियोजन फसते आणि याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.यंदा तर खरीप हंगाम संपला तरी पीककर्ज वाटपाचा आकडा ५५.३८ टक्क्यांवरच थांबला आहे. विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानंतरही बँकांनी हात आखडता घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.मागील तीन-चार वर्षांपासून पावसाचा लहरीपणा, किडींचा प्रादुर्भाव आणि अवकाळी यामुळे पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. काही पिकांतून मिळणाऱ्या उत्पन्नापासून लागवडही वसूल होत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

त्यामुळे पेरणीसाठी लागणाऱ्या बी-बियाण्यांची जुळवाजुळव करताना मोठी कसरत करावी लागते. किमान खरीप पेरणीच्या तोंडावर बँकांनी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठणे अपेक्षित आहे; परंतु पेरणी पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यातील निम्म्या शेतकऱ्यांनाही पीककर्ज मिळत नसल्याचा आजवरचा अनुभव आहे.

परिणामी, शेतकऱ्यांवर खासगी सावकाराचे उंबरठे झिजविण्याची वेळ येते. मागील वर्षीही पीककर्जाच्या बाबतीत शेतकऱ्यांना अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला. किमान यंदा तरी वेळेत पीककर्ज वाटप होईल, अशी अपेक्षा होती; मात्र हंगाम संपला तरी ५५.३८ टक्क्यांवरच पीककर्ज वाटपाचेघोडे थांबले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत १४ टक्क्यांनी घसरले वाटप

■ जिल्ह्यात खरीप हंगामाच्या अखेरपर्यंत ६९.२९ टक्के पीककर्ज वाटप झाले होते. यंदा मात्र केवळ ५५.३८ टक्क्यांवरच पीककर्ज वाटप थांबले आहे.

■ परिणामी, जवळपास निम्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले नसल्याने त्यांना सावकाराचे उंबरठे झिजवावे लागले.

■ पीककर्ज वाटपात उदासीनता दाखविणाऱ्या बँकांवर जिल्हा प्रशासनाचाही वचक राहिला नसल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.

उद्दिष्ट ८९१ कोटी ७७ लाखांचे; वाटप ४९३ कोटी ८६ लाख...

खरीप हंगाम २०२४-२५ साठी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ८९१ कोटी ७७ लाख रुपये देण्यात आले; परंतु ३० सप्टेंबरपर्यंत केवळ ४९३ कोटी ८६ लाख रुपयांचे वाटप झाले. याची टक्केवारी ५५.३८ एवढी आहे.

१ ऑक्टोबरपासून रब्बीसाठी पीककर्ज....

रब्बी हंगाम २०२४-२५ साठी १ ऑक्टोबर ते ३१ मार्चदरम्यान पीककर्ज वाटप होणार आहे. मागील दहा दिवसांत रब्बीसाठी एकाही बँकेने पीककर्ज वाटप केले नसल्याची माहिती आहे. खरीप तर गेला आता रब्बीसाठी तरी वेळेत पीककर्ज मिळावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

खरीप पीककर्ज वाटपाची स्थिती

बँकउद्दिष्ट (रु. लाखांत) वाटप
जिमस बँक१४६०७,००१९९७५.०६
व्यापारी बँक ५६७५३,००१७३५८.९७
ग्रामीण बँक१७८१७.००२००५२,००

वाटपाची टक्केवारी

बॅंक  टक्केवारी
व्यापारी बॅंक३०.५९
जिमस बँक८१.९८
ग्रामीण बँक८९.९८
टॅग्स :शेती क्षेत्रपीक कर्जपीकशेतकरीशेती