Join us

पश्चिम विदर्भात १.१७ लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2023 3:35 PM

धो-धो बरसला : ७२ मंडळांत अतिवृष्टी; चार जणांचा मृत्यू, आठ जखमी

गेल्या ४८ तासांत ७२ अमरावती महसूल मंडळांत झालेल्या अतिवृष्टीने पश्चिम विदर्भातील नदी-नाल्यांना पूर येऊन काठालगतची ६४८ हेक्टर शेतजमीन खरडली गेली. शिवाय बांध फुटणे व शेतात पाणी साचल्याने किमान १,१७,२०० हेक्टरमधील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा प्राथमिक अहवाल आहे.

पश्चिम विदर्भात आतापर्यंत ३०७ मि.मी. पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात २७६ मि.मी. पाऊस पडला. ही ८९.३ टक्केवारी आहे. पावसाची अद्याप ११ टक्के तूट आहे. गत याच तारखेला ४३६ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.  १८ तारखेला अमरावती जिल्ह्यातील ६. अकोला जिल्ह्यातील ९, यवतमाळ जिल्ह्यातील ३३, बुलढाणा जिल्ह्यातील २० तसेच १९ तारखेला बुलढाणा जिल्ह्यातील ५ अशा एकूण ७२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सध्याही यलो अलर्ट असल्याने काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातील धनज (बु.) परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कोवळ्या पिकांना चांगलाच फटका बसला.

जिल्हानिहाय बाधित पिकांचे क्षेत्रविभागात दोन दिवसांत अमरावती जिल्ह्यात ३.२२९ हेक्टर, अकोला जिल्ह्यात १४,८०७ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यात १,३३३ हेक्टर, वाशिम जिल्ह्यात ६.१६८ व बुलढाणा जिल्ह्यात ९२,२१३ हेक्टरमधील सोयाबीन, तूर, कापूस, उडीद व मूग पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. या बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात येत आहेत. 

वीज पडून दोघांचा मृत्यूअमरावती जिल्ह्यात वीज पडून दोघांचा तर अंगावर भिंत पडून बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात अशाच घटनांमध्ये आठ जण जखमी झालेत. संततधार पावसाने लहान- मोठी १४ जनावरे मृत झाली. याशिवाय ३८४ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

टॅग्स :मोसमी पाऊसखरीपशेती