Join us

कापूस पिकासह, फळबाग व भाजीपाला व्यवस्थापन असे करा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 3:14 PM

सध्याच्या हवामानानुसार या आठवड्यात १२ ते १७ सप्टेंबर २३ दरम्यान पीक व्यवस्थापन कसे करायचे? या संदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे.  

कापूस  पीक व्‍यवस्‍थापन असे करा

कापूस पिकाची उंची पाच फुट झाल्यास शेंडा खुडावा किंवा कापूस पिकाची वाढ थांबवण्यासाठी सायकोसिल या वाढरोधकाची 2 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. 

मागील काही दिवसात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे, कापूस पिकात फुलकीडे यांचा प्रादूर्भाव वाढला आहे याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 30 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा लिकॅनिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7% 168 मिली  ‍किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. 

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली (पूर्वमिश्रीत किटकनाशक) प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे. 

तूर,मूग आणि उडीद आणि भुईमुग

तूर पिक 55 ते 60 दिवसाचे झाले असल्यास तूरीचे शेंडे खुडावे यामूळे तूर पिकाला जास्तीत जास्त फांद्या फुटतात. मागील काही दिवसात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे, तुर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 30 मिली किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. 

काढणीस तयार असलेल्या मुग/उडीद पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. काढणी केलेल्या शेंगाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेंगा पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.  

मागील काही दिवसात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे, भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या भुईमूग  पिकात अऱ्या सुटण्याच्या अवस्थेत शक्य असल्यास भुईमूगाच्या पिकावरून रिकामे ड्रम फिरवावे. 

त्यामूळे अऱ्या जमिनीत घुसण्यास मदत होऊन शेंगाची संख्या वाढते परिणामी उत्पादनात वाढ होते. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  80 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 80 मिली प्रति एकर वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन असे करा

काढणीस तयार असलेल्या केळी घडांची काढणी करून घ्यावी. केळी बागेत प्रति झाड 50 ग्रॅम नत्राची खतमात्रा द्यावी. द्राक्ष बागेत नविन फुटणाऱ्या फुटव्यांवर भूरी व करपा या रोगाचा प्रादूर्भाव दिसू शकतो, त्यामूळे अतिरिक्त असलेल्या फुटी काढून टाकाव्यात व आवश्यक फुटी तारांवर व्यवस्थित बांधून घ्याव्यात. त्यामूळे आर्द्रता कमी होऊन वेलींमध्ये हवा खेळती राहील. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा लिकॅनिसिलीयम लिकॅनी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

भाजीपाला व्यवस्थापन

मागील काही दिवसात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे, भेंडी व काकडी वर्गीय पिकावरील भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्युटॅनील 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्यामूळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी स्कीन रोगाचा प्रादूर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. याची सर्वात जास्त झळ लहान वयातील वासरांना जाणवत असून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

अशा वेळी नियंत्रणासाठी व त्यांची शारिरीक प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 1) वासरांना चिक पाजावा. 2) वयाच्या सातव्या दिवशी जंतनाशक औषधीची मात्रा द्यावी. 3) महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक तत्वानूसार लसीकरण करून घ्यावे. 4)आजारी आणि निरोगी वासरे, गोधन स्वतंत्र पणे विलगीकरण करावे. 5) सर्वात महत्वाचे म्हणजे 20% सूश्रूषा व 80% काळजी (ज्यामध्ये पाणी, सकस चारा, जखमांची सुश्रुषा ईत्यादी) गोष्टी कराव्यात. 6) “माझे पशुधन माझी जबाबदारी” या सुत्रानूसार आपल्या गोवंशीय पशुधनाची या कालावधीमध्ये जास्तीत जास्त काळजी घ्यावी.

(सौजन्‍य :मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

टॅग्स :पीक व्यवस्थापनकीड व रोग नियंत्रणपाऊस