Crop Management :
वाशिम : यंदा अधिकांश क्षेत्रावरील हळद पिकाला कंदकुज आणि करपा रोगाने घेरले आहे. दुसरीकडे मात्र वाशिम तालुक्यातील ब्रह्मा या गावात शेतकऱ्यांनी हळद पिकात मिरचीचे आंतरपीक घेतल्याने करपा व कंदकुज या रोगांवर नियंत्रण मिळाले असून दोन्ही पिकांची वाढ जोमाने होत असल्याचे सर्वेक्षण कृषी विभागाकडून नोंदविण्यात आले आहे. 'आत्मा'चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यातील कोकलगाव, आडगाव, बोरखेडी, उकळीपेन, सुकळी, वारा, देपूळ, कळंबा महाली, काटा, धारकाटा, ब्रम्हा, पिंपळगाव, पार्टी आसरा, उमरा शम., उमरा कापसे, सोनखास, तामसी, टो, अटकळी, वाघोली, केकतउमरा, वाकद, लिंगा कोतवाल, रिठद, आसेगाव, कोयाळी, भर जहागीर, बाळखेड, केनवड, डोंगरकिन्ही, डव्हा, डही, शिरपूर, ढोरखेडा या गावांसह इतरही अनेक गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून हळदीच्या लागवड क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे.
त्यापासून चांगले उत्पन्नदेखील मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. परंतु यंदा हे पीक जोमात असतानाच अधिकांश ठिकाणी करपा आणि कंदकुज या रोगाचा हळदीवर 'अटॅक' झाला. परिणामी, हळदीची पाने सुकत असून पिकाचे मूळ देखील सडत असल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली. एकीकडे हे विपरित चित्र असतानाच दुसरीकडे मात्र ब्रह्मा या गावातील ज्या शेतकऱ्यांनी हळदीमध्ये मिरचीचे आंतरपीक घेतले आहे, त्यांच्या हळदीचे करपा व कंदकुजापासून संरक्षण झाल्याची माहिती लव्हाळे यांनी दिली.
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सल्ला
जिल्ह्यात प्रामुख्याने वाशिम, रिसोड आणि मालेगाव या तीन तालुक्यांमध्ये शेकडो हेक्टर क्षेत्रावर हळद पिकाची लागवड झालेली आहे. मात्र, यावर्षी या पिकाला करपा आणि कंदकुज रोगाने घेरल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. कृषी विभागाची यंत्रणा बांधावर पोहचून शेतकऱ्यांचे उद्बोधन करत असल्याचे दिसत आहे.
हळद पिकास ३ ते ३.५ महिन्यांनी फुटवे येऊन कंद पोसण्यास सुरुवात होते. हळकुंड धरण्यापूर्वी आंतरपिकाची काढणी फायदेशीर ठरते. त्यामुळेच हळद पिकात श्रावणघेवडा, कोथिंबीर, कोबी, फुलकोबी, पालेभाज्या आणि मिरची या पिकांची लागवड योग्य राहते. ब्रम्हा येथे शेतकऱ्यांचे मिरचीच्या आंतरपिकाने नुकसान टळल्याचे दिसत आहे. - जयप्रकाश लव्हाळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, 'आत्मा', वाशिम