Crop Management : सद्यः स्थितीत मोसंबी (Mosambi) व संत्रा (Oranges) पिकावर पाने खाणारी अळी म्हणजेच लेमन बटरफ्लाय (Lemon Butterfly) व सिट्रस सायला या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळून येत आहे. याच्या व्यवस्थापनासाठी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे.
मोसंबीवरील पाने खाणाऱ्या अळीचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यापीठाने काही शिफारशी दिल्या आहेत. त्या सविस्तर पाहुयात.
पाने खाणाऱ्या अळीची ओळख
* या किडीचा त्रास प्रामुख्याने रोपवाटीकेत होतो. याचे पतंग काळ्या पिवळ्या आकर्षक रंगाचे असतात.
* लहान अळ्या तपकिरी रंगाच्या व त्यावर पांढरे ठिपके असतात. त्यामुळे त्या पक्षाची विष्ठा पडल्यासारख्या दिसतात.
* मोठया अळ्या हिरवट रंगाच्या असतात. या अळ्या कोवळी पाने खातात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण झाड पर्णविरहीत दिसते.
एकात्मिक कीड व्यवस्थापन
* अंडी, अळ्या व कोष हातांनी गोळा करुन रॉकेल मिश्रीत पाण्यात बुडवून मारणे. झाड हालवून खाली पडलेल्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
* बागेतील अथवा आजुबाजूस असलेले बावची या तणाचा बंदोबस्त करावा.
* मित्र कीटक जसे ट्रायकोग्रामा, अपेन्टेलस, कॅरोप्स, ब्रँचीमेरीया, टेरोमॅल्स आदींचे संवर्धन करावे.
* बॅसिलस थुरीनजिएन्सीस (बीटी) पावडरची २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
* रासायनिक कीटकनाशके क्विनालफॉस २० ईसी ३० मि. ली. किंवा थायोडीकार्ब ७० डब्लुपी १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सिट्रस सायला किडीचे व्यवस्थापन करताना काय उपाय योजना कराव्यात ते पाहुया सविस्तर
एकात्मिक व्यवस्थापन
* झाडावर भरपूर पालवी राहावी, यासाठी अन्नद्रव्याचा शिफारसीनुसार वापर करावा. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळून आल्यास त्वरित पुरवठा करावा.
* रोगमुक्त मातृवृक्षापासून कलम कोडी निवडाव्यात. रोगमुक्त प्रमाणित कलमांचाच लागवडीसाठी वापर करावा
* एखाद्या फांदीमध्ये ग्रोनिंगची लक्षणे दिसल्यास तेवढीच फांदी तत्काळ कापून नष्ट करावी, अधिक प्रमाणात प्रकोप असल्यास बाधित झाडे मुळासकट उपटून, जाळून नष्ट करावीत.
* फांद्याच्या कापणीसाठी वापरली जाणारे औजारे सोडिअम हायपोक्लोराइट (१ टक्का) द्रावणाने निर्जंतुक करावीत.
* सिट्स सायला या कोडीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे (३० बाय ४० सेंमी आकाराच्या फोमशीटपासून बनविलेले घरगुती किंवा तत्सम आकाराचे बाजारात उपलब्ध) ३० ते ४० प्रति एकर लावावे. हे चिकट सापळे फेब्रुवारी ते नोव्हेंबर दरम्यान लावावे.
* डालकिडा, क्रायसोपा, सिरफीड माशी, टॅमरंक्सीया रंडीयाटा आदी मित्र कीटकांचे संवर्धन करावे.
* पर्यायी खाद्य वनस्पती (कडीपत्ता) मोसंबीच्या बागेमध्ये किंवा आजूबाजूस असू नये. कारण ही झाडे सायला किडीचे खाद्य असून, प्रजाननाचे फार मोठे स्रोत ठरू शकतात.
* सिदूस सायला या कोडीच्या नियंत्रणासाठी थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) २१ ग्रॅम किंवा इमिडॅक्लोप्रिड (१७.८ % एसएल) ०१ मि.लि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरज पडल्यास १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी, परंतु कीटकनाशक बदलून वापरावे.
(सौजन्य : फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप), किटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)