पुणे : राज्यात दिवसेंदिवस पीक पद्धतीमध्ये मोठा बदल होत आहे. यामध्ये नगदी पिकांच्या पेरणीखालील क्षेत्र वाढताना दिसत असून राज्यातील पारंपारिक पिकांकडे शेतकरी पाठ फिरवत आहेत. मागील दोन दशकांचा विचार केला तर राज्यात कापूस, सोयाबीन, ऊस आणि मका या पिकांच्या लागवडीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून येते. तर तीळ, कारळे, सूर्यफूल, खरीप ज्वारी, बाजरी, रागी या पारंपारिक पिकांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.
मागील खरीप हंगामात १ कोटी ४१ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. या पेरणीखालील क्षेत्रातील सुमारे ३१.३८ टक्के क्षेत्रावर तेलबियांची पेरणी झाली होती. या तेलबियांपैकी ९६.२१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती तर उर्वरित ३.७९ टक्के क्षेत्रावर तीळ, कारळे, सूर्यफूल, भूईमूग आणि इतर तेलबियांचे उत्पादन घेतले गेले होते.
यंदाच्या खरीप हंगामाचा विचार केला तर कृषी विभागाच्या नजर अंदाजित आकडेवारीनुसार तीळ आणि कारळांची पेरणी सरासरीच्या तुलनेत केवळ ३० टक्के क्षेत्रावर म्हणजेच ४ हजार ५०० हेक्टर आणि ३ हजार ८०० हेक्टरवर झाली आहे. भुईमुगाची लागवड यंदा सरासरीपेक्षा केवळ ७७ टक्के म्हणजेच १ लाख ४८ हजार हेक्टरवर झाली आहे. विशेष म्हणजे सोयाबीनची पेरणी ही सरासरीच्या १२४ टक्के झाली असल्याची माहिती आहे पण यंदाच्या खरिपात सोयाबीनखालील क्षेत्र घटल्याची माहिती तज्ज्ञांकडून मिळत आहे.
तेलबियांचे क्षेत्र का घटले?
साधारण २००० सालाच्या आधी महाराष्ट्रात सोयाबीन हे पीक खूप कमी क्षेत्रावर घेतलं जायचं. १९८४ साली पहिल्यांदा महाराष्ट्रात सोयाबीनची लागवड झाली. त्याअगोदर सूर्यफूल, भुईमूग, तीळ या तेलबियांकडे शेतकऱ्यांचा कल होता. पण सोयाबीन हे नगदी पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळू लागला, उत्पादकता जास्त असल्यामुळे या पारंपारिक पिकांपेक्षा शेतकऱ्यांना चांगले पैसे हातात मिळाल्यामुळे शेतकरी पारंपारिक पिकाकडे पाठ फिरवू लागले.
त्याचबरोबर तेलबियांसाठी महाराष्ट्रात मूल्यसाखळी विकसित झाली नाही. मोठ्या प्रमाणावर तेलाची आयात केली जात असल्यामुळे तेलबियांचे दरही कायम कमीच असतात. सोयाबीनच्या तुलनेत सूर्यफूल, तीळ, भुईमूग या पिकांवरील संशोधन कमी झाले. परिणामी या पिकांची उत्पादकता फारशी वाढली नाही.
पारंपारिक पिकांची उत्पादकता घसरली आहे. राज्यात तेलबियांचे दर कायमच कमी आहेत ते कधीच जास्त वाढल्याचं दिसत नाही. जोपर्यंत राज्यामध्ये तेलबियांवर प्रक्रिया उद्योग होत नाहीत तोपर्यंत दर वाढत नाहीत. या पिकांवर मुल्यवर्धन केलं जात नाही, तर व्यापारी पीक म्हणून मूल्यसाखळी विकसित झालेली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या पिकांबाबत अनास्था आहे.
- डॉ. सोमिनाथ घोळवे (शेतीप्रश्नांचे अभ्यासक)