यंदा खरिपाच्या सुरवातीपासूनच पाऊसाची अनियमितता दिसून येते आहे. पावसाच्या दीर्घकालीन खंडात वाढ होत आहे, अशा खंडाच्या परिस्थितीत पिकांचे नियोजन कसे कराल याविषयीचा सल्ला
- पावसाच्या खंडाच्या काळात हलकी आंतरमशागत/कोळपणी उपयुक्त ठरते. त्यामुळे तण नियंत्रणासोबतच जमीनीच्या भेगा बुजल्यामुळे जमिनीतील ओलावा उडून जाण्याचे प्रमाण कमी होते.
- पावसाच्या दीर्घकालीन खंडामुळे जमिनीतील ओलावा कमी झाल्यास, पाण्याचा ताण बसलेल्या पिकास पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी दोन ओळ/सरी आड पद्धतीने किंवा रुंद वरंबा सरी पद्धतीत सरीमध्ये संरक्षित ओलीत करावे. शक्य असेल तर सूक्ष्म सिंचन पद्धतीद्वारे पिकानुसार ठिबक सिंचन अथवा तुषार सिंचनाचा अवलंब करावा. सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी ओलीत करणे अधिक योग्य राहील.
- पिकांच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित ओलीत करणे उत्पादकतेचे होणारे संभाव्य नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने व शाश्वत उत्पादनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरते जसे पीक वाढीची
- अवस्था, फुलोरा व दाणे भरण्याची अवस्था/बोंडे धरण्याची अवस्था इत्यादी.
- संरक्षित ओलित उपलब्ध नसल्यास पिकामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याच्या दृष्टीने तसेच अन्नद्रव्य पुरवठ्याच्या दृष्टीने, पोटेशिअम नायट्रेट (१३ :००:४५) या विद्राव्य खताची साधारणपणे १ टक्का (१०० ग्राम प्रति १० लिटर पाणी) या प्रमाणात सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी फवारणी उपयुक्त ठरते. पोटेशिअम नायट्रेटची फवारणी पिकांची पाण्याच्या संभाव्य ताणास प्रतिकार क्षमता वाढविते.
- पाऊस किंवा सिंचन पश्चात पिकामध्ये पाण्याच्या ताणाची स्थिती सुधारल्यावर कापूस पिकामध्ये फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया आणि बोंडे धरण्याच्या/पोसण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपीची फवारणी फायदेशीर ठरते. सोयाबीन पिकामध्ये ५० व ७० दिवसाच्या पीक अवस्थेत २ टक्के युरियाची फवारणी किंवा शेंगा धरण्याच्या अवस्थेत २ टक्के १९:१९:१९ (पाण्यात विरघळणारे खत) नत्र स्फुरद पालाश ची फवारणी अधिक उत्पादनाच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.
- कमी क्षेत्रावर लागवड केलेल्या किंवा भाजीपाला पिकामध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी अच्छादनाचा (गव्हाचा भुसा, काडी कचरा/धसकटे, वाळलेले गवत इ.) वापर करावा. यामुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते.
- फळबागेमध्ये (आळ्यांमध्ये) सोयाबीन/गव्हाचा भुसा, वाळलेले गवत, गिरिपुष्प पाल्याचे आच्छादन करावे. फळबागेमध्ये बोर्डो पेस्टचा वापर करावा. मर्यादित पाणी उपलब्धता अंतर्गत सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
- पिकामध्ये शिफारसीनुसार वेळेवर कीड व रोग व्यवस्थापन करावे ज्यामुळे पिके ताणाच्या स्थितीला अधिक सहनशील राहु शकतील. पावसाच्या खंड काळात रस शोषण करणाऱ्या किडींचा तसेच इतर किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी योग्य ती नियंत्रणाची उपाययोजना करावी.
ग्रामीण कृषि मौसम सेवा
कृषि विद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला