विड्याचे पान या पिकाला कृषी पीक म्हणून मान्यताच नसल्याने विम्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे विड्याचे पान व पानपिपरी या पिकांना कृषी पिकाचा दर्जा देत विम्याचे संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी आ.प्रवीण दटके यांनी विधान परिषदेत केली.
भारतात विड्याचे पानाने बहुतांश समारंभाची सांगता होते. हे जरी खरे असले तरी विड्याच्या पानाला पिकाचा दर्जा देण्याची मागणी विधानपरिषदेत करण्यात आली आहे. याशिवाय या पिकाला विम्याचे संरक्षणही द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. मंगळवारी नियम ९७ अन्वये अवकाळी पावसावर सुरू असलेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान ते बोलत होते. पानपिंपरीतून आयुर्वेदिक औषधे तयार होतात याकडे दटके यांनी लक्ष वेधले.पीक विमा कंपन्यांकडून नागपुरातील काही शेतकऱ्यांना १२, ५२, ५६ रुपयांची रक्कम देण्यात आली. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष घालावे, कंपन्यांनी शेतकऱ्यांची थट्टा करू नये अशी मागणी त्यांनी केली.
विड्याच्या पानात अनेक औषधी गुणधर्म
- डोकेदुखीसह अनेक दुखण्यांवर विड्याचे पान उपयुक्त असल्याचे तज्ञ सांगतात.श्वसनाच्या समस्यांसह सांधेदुखीसाठीही विड्याचे पान खाण्याचा सल्ला दिला जातो.
- पचनक्रीया सुधारते- आयुर्वेदात विड्याच्या पानात औषधी गुणधर्म असल्याचे उल्लेख आढळतात. जेवणानंतर विड्याच्या पानाने पचनक्रीया सुधारते.
- खोकला आणि सर्दी झाली असेल तर विड्याचं पान बरी व्हायला मदत करते. जुनी सर्दी, छाती आणि फुफ्फुसाच्या रोग्यांना, दम्याने पीडित लोकांसाठी हा एक उत्तम उपचार आहे.