पुणे : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सुमारे ५०० हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. या नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यांचे काम लवकर सुरू करावे, अशा सूचना महसूल विभागाला देण्यात आल्या आहेत.
सर्वाधिक २६ हजार ५८२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहे. भंडारा जिल्ह्यातही सुमारे २३ हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाले आहेत. नुकसान झालेल्या पिकांमध्ये खरिपातील बहुतांश पिकांचा समावेश आहे. राज्यात गेल्या महाराष्ट्रासह विदर्भात अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक नजरअंदाजानुसार राज्यातील १ लाख ४१ हजार ३११ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये मुख्यत्वे सोयाबीन, कापूस, भात, तूर, उडीद, मूग, भाजीपाला, केळी, बाजरी मका, ऊस, भुईमूग यांचा समावेश आहे.
अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कोल्हापूर जिल्ह्याला बसला असून, येथील २६ हजार ५८२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल भंडारा जिल्ह्यातील २३ हजार २६० हेक्टरवरील पिके पाण्यात वाहून गेली आहेत.
अतिवृष्टीमुळे राज्यातील ४८६ हेक्टर जमीन खरवडली
■ या अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यातील ४३० हेक्टर जमीन खरवडून गेली आहे. तसेच अकोला जिल्ह्यातील ३४ हेक्टर, सातारा जिल्ह्यातील ९.२१ हेक्टर तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३.६१ हेक्टर अशी एकूण ४८६ हेक्टर जमीन पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
■ दरम्यान, नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल विभागाला आदेश देण्यात आले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आर्थिक मदत तातडीने मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
जिल्हानिहाय झालेले नुकसान (हेक्टरमध्ये)
सिंधुदुर्ग - १४४०.४०
रायगड - ३०.८१
रत्नागिरी - २३१.४९
जळगाव - २०८.९०
धुळे - ३८३.७०
नंदूरबार - २५५.९५
नगर - ८२
पुणे - ५७४.९१
सातारा - ५४.१३
सांगली - ८५५६.०५
कोल्हापूर - २६,५८२
परभणी - ७,५१२
हिंगोली - २,४४५
बुलढाणा - ११,१६३
अमरावती - ८४९.४६
अकोला - ३,१४२.३०
वाशिम- ७०५
यवतमाळ- ९५३.१०
नागपूर - ६,७६३
वर्धा - १०,९२५
चंद्रपूर -१८,७३६.२५
गोंदिया - १,९७९
भंडारा - २३,२६०.५०
गडचिरोली - ११,४८०.२०
एकूण - १,४१,३११.१५