Join us

बी-बियाणे, खते खरेदीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 12:56 PM

यंदा खतांच्या किमतीत कुठलीही वाढ झाली नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

यंदा वेळेवर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे खरीप पेरणीसाठी बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करीत आहेत. त्यामुळे कृषी सेवा केंद्रावर गर्दी होत आहे.

हवामान खात्याने यंदा वेळेवर पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व शेतीची मशागतीचे कामे आटोपली. दरम्यान, दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची तयारी सुरू केली. शेतकरी बी- बियाणे, रासायनिक खते खरेदी करीत आहेत. त्यामुळे कृषी सेवा केंद्रांवर गर्दी होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. अहमदपूर तालुक्यातील काही शेतकरी कपाशीच्या बियाणांची चौकशी करीत आहेत. दरम्यान, यंदा खतांच्या किमतीत कुठलीही वाढ झाली नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

जादा दराने विक्री केल्यास आंदोलन

कृषी सेवा केंद्र चालकांनी विक्री परवाना दर्शनी भागात लावावा, साठा व भाव फलक सहज दिसेल अशा ठिकाणी लावावा. साठा नोंदवही अद्ययावत ठेवावा. बिलावर शेतकऱ्यांची सही अथवा अंगठा घ्यावा. ई-पॉसआधारे विक्री करावी. विक्रीस ठेवलेल्या बियाणांचे व खतांचे स्रोत ठेवण्यात यावेत. चढ्या भावाने, लिंकिंग अथवा बोगस खत, बियाणे विक्री करू नये; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी दिला आहे.

कपाशीकडे शेतकऱ्यांचा कल

* सोयाबीनला कमी दर मिळत असल्याने यंदा तालुक्यातील शेतकरी कापसाला पसंती देत आहेत. त्यामुळे कपाशीच्या बियाणांना मागणी वाढली आहे. त्यामुळे तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांवर कपाशीच्या बियाणांचा तुटवडा झाला असल्याचे पाहावयास मिळत आहे.

तालुक्यातील सर्व भागांत पावसाने हजेरी लावल्याने खते, बियाणे खरेदीसाठी शेतकरी गर्दी करीत आहेत. शेतकरी कापसाच्या एका विशिष्ट कंपनीच्या वाणासाठी आग्रह धरू लागले आहेत. कापसाचे सर्व कंपनीचे बियाणे चांगले आहे. कृषी सेवा केंद्र चालकांकडे कापसाच्या वेगवेगळ्या कंपन्यांचे बियाणे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.-शिवाजीराव पाटील, कृषी सेवा केंद्र चालक

खतांच्या भावात वाढ नाही

यंदा खताचे दर वाढले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी एमआरपीप्रमाणे खते खरेदी करावीत. बियाणे, खते घेताना पक्के बिल घ्यावे. किमान १०० मिमी पाऊस झाला असल्यास पेरणी करावी. काही तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तसेच पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. दरम्यान, कृषी सेवा केंद्र चालकांनाही सूचना करण्यात आल्या आहेत. - भगवान तवर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :शेतीपीक व्यवस्थापनखते